Sushma Andhare and Anjali Damania clash over CDR : अशोक खरातप्रकरणी नेत्यांचे सीडीआर लीक झाल्याप्रकरणी राज्यात बरीच चर्चा सुरू आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सर्वांत आधी सीडीआर माध्यमांवर जाहीर केले. अत्यंत गोपनीय माहिती अंजली दमानियांपर्यंत कशी पोहोचली यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. याबाबत सुषमा अंधारे यांनीही त्यांना लक्ष्य केलं. त्यावर अंजली दमानिया यांनी त्यांना सविस्तर व्हिडिओ करून प्रत्युत्तर दिलं आहे. या प्रत्युत्तराला सुषमा अंधारेंनीही उत्तर दिलं आहे.
सीडीआर पोहोचवणारा माणूस कोण? हे कॉल डिटेल्स कोणत्या अॅप्सवरून काढले, भाजपाच्या फक्त आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील यांचेच सीडीआर कसे सापडले? कोरेगाव पार्कमध्ये लढणाऱ्या तुम्ही जैन बोर्डिंग मध्ये गप्प होतात?असे विविध प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले होते. त्यावर अंजली दमानिया यांनी उत्तर दिलंय.
अंजली दमानिया काय म्हणाल्या?
“माझ्यावर प्रचंड राग आहे म्हणून विषय सोडून त्यांचा फोकस अंजली दमानियांवर आहे. त्यांना असं कुठेतरी दाखवायचं आहे की अंजली दमानिया भाजपासाठी काम करतात. मी खूपवेळा सांगितलं आहे की मी सर्व विषय बोलत नाही, तर मी जे विषय घेते ते तडीस नेते. नुसतीच बडबड मी कधीही केली नाही. मला घर, संसार, मित्र मंडळी आहेत. मला फिरायला खूप आवडतं. मी आताही चंदीगडला आहे. पण प्रश्न विचारत राहायचे, काहीही बरळत राहायचं यापेक्षा तुम्हाला काहीही येत नाही. सीडीआर ज्याने पाठवला त्याला मी ओळखत नसून क्लॉड नावाच्या सॉफ्टवेअरवरून मी कॉल डिटेल्स काढले होते, असं अंजली दमानिया म्हणाल्या. तसंच, कोरेगाव पार्कप्रकरणी मी लढले नव्हते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
“या प्रकरणात मी DG सदानंद दाते ह्यांची वेळ मागितली आहे. तुम्हाला काळजी नसावी. आता तुमच्या व्हिडिओ बद्दल, तुम्हाला फक्त माझ्या विरुद्ध बोलायला फार आवडत असेल. मुद्द्यावर बोलण्याऐवजी माझ्यावर इतका राग? पण विषय फार गंभीर आहे, माझ्याविरुद्धची लढाई दुसऱ्या दिवसासाठी ठेवा. मी तुमच्याशी कुठल्याही स्पर्धेत नाही. खरंतर तुम्हाला काळजी ह्या गोष्टीची वाटायला हवी होती की १) उपमुख्यमंत्र्यांनी १७ कॉल का केले? ते २१ मिनिट काय बोलले? ते सत्तेत आहेत, मी नाही. २) रुपाली चाकणकरांनी १७७ कॉल का केले? चौकशी व्हायला नको? ३) सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, आशीष शेलार, संजय शिरसाठ, दीपक लोंढे आणि मिलिंद नार्वेकर ह्यांची चौकशी कधी होणार? काय संबंध होते ह्या सगळ्यांचे? मी ह्या मुद्द्यावर बोलते, त्या मुद्द्यावर नाही…. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, मी प्रत्येक मुद्द्यावर बोलत नाही. कारण आयुष्यात कुटुंब, मित्र, आणि इतर जबाबदाऱ्या आहेत. पण जेव्हा एखादा मुद्दा हातात घेते, तेव्हा पूर्ण ताकदीने लढते. फक्त बोलत राहत नाही”, असं अंजली दमानिया म्हणाल्या.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
“तुमच्या बाजूने किंवा तुमच्या विरुद्ध बोलल्याने फायदा नुकसान किंवा चर्चा होते अशा कुठल्याही भ्रमात राहू नका. गतकाळातल्या एका स्वयंघोषित समाजसुधारकाची तुम्ही सुधारित आवृत्ती आहात हे एव्हाना सगळ्यांना कळलेलेच आहे. मी तुम्हाला अगदी मुद्द्याचे प्रश्न विचारलेले आहेत. रूपाली चाकणकरची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी झालीच पाहिजे. या प्रकरणाशी संबंधित कोणीही असो त्या कुणाचीही गय केली जाऊ नये हीच भूमिका आहे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
“पण हे सगळं बोलताना, तुम्ही मूळ प्रश्नाला बगल दिली तुम्हाला सीडीआर दिले कुणी? असा कोणता ॲप आहे, ज्यामध्ये नंबर टाकल्यावर इनकमिंग आउटगोइंग कॉल ड्यूरेशन या सगळ्या गोष्टी मिळतात? तो कोण माणूस आहे ज्याच्या म्हणण्यावर तुम्ही इतका विश्वास टाकला? या प्रश्नांना बगल का देताय? बरोबर भाजपाचे प्रकरण आल्यावर तुमचे मित्र नातेसंबंध त्यांचे सुखदुःखाचे कार्यक्रम या सगळ्या गोष्टीत तुम्ही कशा काय व्यस्त होता? आणि एरवी मात्र तुम्ही दुबई अमेरिकेत आसाममध्ये कुठेही असाल तिथून अचानक प्रकट होता”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
