लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खून प्रकरणी तीन महिने पोलीसांना गुंगारा देणाऱ्या संशयित सिध्दार्थ तथा बाबा चिपरीकर याला बुधवारी कागलमध्ये अटक करण्यात आली. पुढील तपासासाठी त्याला इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी समीर साळवे यांच्या ताब्यात देण्यात आले.

सांगलीतील कार्यकर्ते कदम यांचा अज्ञात कारणावरुन अज्ञात ठिकाणी दि. ७ मार्च २०२४ रोजी खून झाला होता. खून करुन मृतदेह नांदणी- कुरुंदवाड मार्गावरील गॅस गोदामाजवळ स्विप्ट मोटारीत ठेवण्यात आला होता. या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-सोलापूर जिल्ह्यात दमदार पावसाने नदी, नाल्यांना पाणी; ओढ्यात तिघे वाहून गेले; दोघे बचावले, तिसरा बेपत्ता

या खूनप्रकरणी काही राजकीय कार्यकर्त्यांकडे चौकशीही झाली होती. तिघांना यापूर्वी अटक झाली असून मुख्य संशयित चिपरीकर फरार होता. कदम यांच्या कुटुंबियांनी कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची भेट घेऊन तपासाबाबत संशय व्यक्त केला होता. श्री. फुलारी यांनी संशयितास अटक करण्याची सूचना सांगली पोलीसांना केली होती. यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक मागावर होते. संशयित कागलमध्ये असल्याची माहिती मिळताच निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, दीपक गायकवाड व अन्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने कागल पोलीसांच्या मदतीने कागलमध्ये चिपरीकर याला अटक केली.