लातूर मनपा सचिव अश्विनी देवडेंवर हलगर्जीपणाचा ठपका, आयुक्तांकडून निलंबनाची धडक कारवाई

महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी घेण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेसाठी काढलेल्या विषय पत्रिकेत हलगर्जीपणाचा ठपका ठेवत नगरसचिव अश्विनी देवडे यांना निलंबित करण्यात आले आहे.

latur-palika

लातूर : महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी घेण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेसाठी काढलेल्या विषय पत्रिकेत हलगर्जीपणाचा ठपका ठेवत नगरसचिव अश्विनी देवडे यांना निलंबित करण्यात आले आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमन मित्तल यांनी आदेश दिले आहेत. सचिव अश्वनी देवडे यांना यापूर्वी कारवाईच्या संदर्भाने प्रारंभी नोटीस बजावली. त्याचा खुलासा २४ तासात मागवला होता. मात्र खुलासा समाधानकारक नसल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले.

लातूर महापालिकेची पंचवार्षिक मुदत २१ मे रोजी संपण्याच्या एक दिवस आधी २० मे रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. विशेष सभा २० मे रोजी असताना त्याची विषय पत्रिका १० मे रोजी काढण्यात आली होती. विषय पत्रिका महापालिकेच्या सदस्यांना १८ मे रोजी म्हणजे आठ दिवसांनी उशिरा देण्यात आली.

विशेष सभेच्या आयोजनात हलगर्जीपणाचा ठपका

महापालिकेच्या या विषय पत्रिका वितरणाच्या कामात व विशेष सभेच्या आयोजनात हलगर्जीपणा झाल्याची बाब निदर्शनास आल्याने शिस्तभंग झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आपणावर कारवाई का करण्यात येऊ नये, यासंबंधी २४ तासाच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. समाधानकारक खुलासा सादर न केल्यास नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल असेही त्यात कळवले होते.

रोजची उपस्थिती बंधनकारक, विनापरवाना मुख्यालय सोडता येणार नाही

यानुसार नगरसचिव अश्विनी देवडे यांच्याकडून सादर केलेला खुलासा समाधानकारक न वाटल्याने आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला. तसेच मनपा सचिव अश्विनी देवडे यांना निलंबित करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अमन मित्तल यांनी घेतला आहे. निलंबनाच्या आदेशात त्यांना विनापरवाना मुख्यालय सोडता येणार नाही व रोजची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Suspension of latur corporation secretary ashvini devade by commissioner pbs

Next Story
नाफेडकडून हरभरा खरेदी अचानक बंद ; ५० टक्के उत्पादन शेतकऱ्यांकडेच पडून; मुदतवाढीसाठी खासदार, आमदारांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे धाव
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी