सोलापूर : सोलापुरात एका बँकेच्या एटीएममध्ये संशयास्पद डिव्हाईस आढळून आले. पैसे काढणाऱ्या एटीएम कार्डधारकांची आर्थिक फसवणूक करण्याच्या हेतूनेच हे कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी हे संशयास्पद डिव्हाईस बसविले असावे, अशी माहिती निष्पन्न झाली आहे.

शहरातील बँक ऑफ इंडियाच्या रेल्वे लाईन्स शाखेसमोरील एटीएममध्ये हा प्रकार उजेडात आला आहे. हा प्रकार शंकर लोखंडे नावाच्या एटीएम कार्ड धारकाच्या नजरेत आला. लोखंडे हे या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आले. त्यांनी स्वतःच्या खात्यातील पाच हजारांची रक्कम काढली आणि एटीएम कार्ड बाहेर काढू लागले. तेव्हा एटीएम कार्ड थोडेसे अडकले. हात घालून एटीएम काढताना लोखंडे यांच्या हातात आतून एक किट बाहेर आले. या किटमध्ये चिप जोडली होती. ही चिप संशयास्पद आणि आर्थिक  फसवणूक करण्याच्या हेतूने बसविण्यात आली असावी, अशी शंका वाटल्यामुळे लोखंडे यांनी बँकेच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला. तेव्हा लगेचच बँकेचे अधिकारी एटीएममध्ये धावून आले. या एटीएमचे इलेक्ट्रिक पेमेंट ॲन्ड सर्व्हिसेस नावाच्या त्रयस्थ पक्षाकडून व्यवस्थापन केले जाते.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडे धाव घेण्यात आली असून एटीएममध्ये हे संशयास्पद डिव्हाईस कोणी आणि केव्हा बसविले, याचा शोध घेण्यासाठी मागील दोन दिवसांतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. परंतु त्यातून काहीही माहिती पुढे आली नाही. हे संशयास्पद डिव्हाईस दोन दिवसांपूर्वीच्या जास्तीच्या वेळेत बसविण्यात आली असावी, असा तर्क व्यक्त केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.