मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव ते गोंदे हा रस्ता वाहतुकीस खुला झाल्यापासून आजपर्यंत असंख्य अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत. या अपघातांना जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे शनिवारी कोकण गाव फाटा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रवक्ते हंसराज वडघुले, उत्तर महाराष्ट्रप्रमुख दीपक पगार, जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. महामार्गाचे विस्तारीकरण करताना राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, कंत्राटदार व प्रशासनाने निकषांचे पालन केले नाही. यामुळे महामार्ग खुला झाल्यानंतर दिवसागणिक अपघात घडत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. अटी व शर्तीचा भंग झाल्यामुळे या मार्गावरील टोलवसुली थांबविण्याची मागणी करण्यात आली. महामार्गावर राजकीय दबावापोटी मनमानीपणे दुभाजक टाकण्यात आले. उड्डाण पूल खाली उतरवण्यात आला. वारंवार अपघात होऊनही आवश्यक त्या ठिकाणी स्थानिकांसाठी भुयारी मार्ग वा तत्सम व्यवस्था केली गेली नाही. शेतमालाची वाहतूक करणाऱ्या गाडय़ांना टोलमाफी झालीच पाहिजे, अशा मागणीचे निवेदन मोर्चेकऱ्यांनी नायब तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना दिले. आंदोलनामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या.