राज्यकर्ते व साखर कारखानदारांकडून शनिवारी ऊसदराचा सकारात्मक निर्णय होईल, अशी सर्वसाधारण शक्यता धुळीस मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने युध्दभूमी म्हणून जाहीर केलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या कराडात उद्या दुपारपासून शेतकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत. ऊसदराच्या मुंबईतील बैठकीचा केवळ आंदोलनाची हवा काढून घेण्यासाठी बनावच होता, असा सरळसोट आरोप करीत ‘स्वाभिमानी’च्या नेत्यांनी कराडातच ताकदीने आंदोलन छेडून राज्यकर्त्यांची लक्तरे वेशीवर टांगल्याशिवाय क्रांतिकारकांच्या या भूमीतील शेतकरी गप्प बसणार नसल्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. परवा सोमवारी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनीच ‘कराड बंद’ ची हाक देऊन राज्यकर्त्यांना यशवंतरावांच्या समाधीला स्पर्श न करून देण्याचाही इशारा दिला आहे. तर, पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास भर बाजारपेठेतून जंगी संचलन करून ‘हम, कुछ कम नही’ असेच चित्र रंगवले आहे. तसेच, आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर कराडात शेकडो पोलीस व जलद कृतीदलाची पथके दाखल होत असल्याचे वृत्त आहे. मुंबईतील ऊसदराची बैठक निष्फळ ठरल्याचे समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेअंती आक्रमक आंदोलनाच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. तर, वाढीव ऊसदराचा सकारात्मक निर्णय न झाल्याने ऊस उप्तादकातून अन्यायाची भावना व्यक्त केली जात आहे. पाटील यांनी दुपारच्या सुमारास कराडच्या विश्रामगृहावर पत्रकार बैठक आयोजित केली. परंतु, तेथे त्यांना मज्जाव करण्यात आल्याने विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारावरील पारावर पत्रकार बैठक घेण्यात आली. असा प्रकार प्रथमच घडल्याने पत्रकारांनीही नाराजी
व्यक्त केली.