शेतकरी प्रश्नांवरून आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगलीत आज नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनाला आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले. कृषी राज्यमंत्री आणि स्वाभिमानी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या समोरच कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याने संघटनेत फूट पडली असल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या सात कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, शुक्रवारी सांगलीत आले होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून आंदोलन केले. विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हेही होते. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा, ऊसाचा दुसरा हप्ता देण्यात यावा, पिकाला हमीभाव देण्यात यावा यांसह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घुसून आंदोलन केले. यामुळे पोलिसांच्या बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या सात जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अतिथीगृहात आढावा बैठक सुरू असताना मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींचीही कसून चौकशी करण्यात येत होती.