शेतकऱ्यांच्या ऊस दर आंदोलनामुळे पुणे- बेंगळुरु महामार्गावरील सातारा- कोल्हापूर वाहतूक ठप्प झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखला. सातारा जिल्ह्यात  पोलीस बंदोबस्तात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले.

सातारा जिल्ह्यातील एकाही साखर कारखानदारांनी अद्यापही उसाचा दर जाहीर केलेला नाही. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एफआरपी अधिक २०० रूपये आणि मागील थकबाकीची रक्कम कारखानदारांनी द्यावी, या मागणासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज (रविवार) दुपारी १२ वाजता पुणे- बेंगळुरु महामार्गावर पोलीस बंदोबस्तात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसाचा कांडका हालेना, कारखानदार काही बोलेना, ऊस आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा अशा घोषणा दिल्या. रास्ता रोको करणार्‍या शेतकरी संघटना आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी  ताब्यात घेतले.

दरम्यान, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा प्रश्‍न सोडविला. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील ऊस दराचा प्रश्‍न मार्गी लावला जाईल, असे आश्‍वासन जिल्हाप्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर आजचे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. आज दुपारी जिल्हाधिकारी नियोजन भवनामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीतील निर्णयानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील अनेक दूध संघांनी बंद ठेऊन आंदोलनाला पाठींबा  दिला.  तर अनेक गावात व्यवहार बंद ठेउन शेतकरी रस्त्यावर उतरले. सातारा शहरानजीक असलेल्या पुणे – बेंगळुरु राष्ट्रीय महामार्ग देखील आंदोलकांनी अडवला. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यकर्त्यांनी कोरेगाव तालुक्यात कुमठे फाटा, फलटणमध्ये  क्रांतीसिंह नाना पाटील चौकात, खटावमध्ये आयलंड चौक कराडा इंदोली व पाचवड आणि मसूर फाटा येथे रास्ताराको आंदोलने करण्यात आले .