भारतररत्न पुरस्कार प्राप्त झालेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस ‘सुशासन दिन’ म्हणून साजरा करताना गुरुवारी शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले. तर इचलकरंजी शहरामध्ये वाजपेयी यांचा वाढदिवस जल्लोषी वातावरणात साजरा करण्यात आला.
भाजपचे सर्वोच्च नेते वाजपेयी यांचा आज ९०वा वाढदिवस आहे. केंद्र शासनाने त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर करून गौरव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजपेयी यांचा जन्मदिन ‘सुशासन दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. यानिमित्त शहर भाजपाच्या वतीने येथील ऐतिहासिक पंचगंगा घाटावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पक्षाचे कार्यकत्रे, पदाधिकारी, नागरिक तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते. प्रदूषण व अस्वच्छतेमुळे नदीघाटाचे वातावरण ओंगळवाणे बनले होते. आजच्या स्वच्छता अभियानामुळे या परिसरातील दगड, प्लॅस्टिक, निर्माल्य, तण दूर करण्यात आले. कचरा डंपरमधून हलवण्यात आल्यामुळे नदीघाट लखलखीत झाल्याचे पाहायला मिळाले.
या वेळी शहर भाजपचे अध्यक्ष महेश जाधव यांनी साबरमती धर्तीवर पंचगंगा नदी स्वच्छ करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील असे जाहीर करण्यात आले. उपक्रमामध्ये नगरसेवक आर. डी. पाटील, अॅड. संपत पवार, संतोष भिवटे, राहुल चिकोडे यांच्यासह कार्यकत्रे सहभागी झाले होते.
दरम्यान, इचलकरंजी येथे वाजपेयी यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. शहर कार्यालयापासून दुचाकी रॅली काढण्यात आली. मलाबादे चौकात वाजपेयी यांच्या घोषणा देण्यात आल्या. आतषबाजी करण्याबरोबरच नागरिकांना साखर, पेढे वाटण्यात आले. शहर अध्यक्ष विलास रानडे, धोंडिराम जावळे, पांडुरंग म्हातुगडे, गोपाल जासू, वैशाली नाइकवडे आदींची या वेळी भाषणे झाली.