चंद्रपूर महापालिका क्षेत्रात ६ हजार १९२ घरांमध्ये शौचालय नसल्याची धक्कादायक बाब सर्वेक्षणातून समोर आली आहे. एका कुटुंबात सरासरी चार व्यक्ती धरल्या तरी या शहरात सुमारे २५ हजार लोक उघडय़ावर शौचाला जात असल्याचे वास्तव या सर्वेक्षणातून समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात असतांना या आकडेवारीवरून चंद्रपुरात या अभियानाचा संदेश पोहोचलाच नसल्याचे यावरून दिसते.
उद्योगिक शहर, अशी ओळख असलेल्या चंद्रपूरची लोकसंख्या आज सव्वाचार लाखाच्या घरात आहे. महापालिकेचा दर्जा मिळून आज तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. या तीन वर्षांत शहरात रस्त्यांची कामे अतिशय झपाटय़ाने झाली. मात्र, स्वच्छतेत हे शहर पिछाडीवर असल्याचे वास्तव समोर आले आहे. प्रदूषणात हे शहर देशात सहाव्या क्रमांकावर आहे. प्रदूषणाचे वारे या शहरात सातत्याने वाहत आहेत. जल, वायू व ध्वनी प्रदूषण यात चंद्रपूर आजही आघाडीवर आहे. आता तर महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणातून तब्बल ६ हजार १९२ घरांमध्ये शौचालये नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शनिवार, ४ जूनला देशभरात शाळाबाहय़ मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यासोबत मनपाने शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन शौचालयांचे सर्वेक्षणही केले. यातून ही धक्कादायक माहिती समोर आली. विशेष म्हणजे, एका कुटुंबात सरासरी चार व्यक्ती असतात. या सर्वेक्षणाची आकडेवारी बघितली तर एकटय़ा चंद्रपुरात सुमारे २५ हजार लोक घराबाहेर शौचाला जात आहेत. या ६ हजार लोकांकडून सर्वेक्षणाचा फार्म भरून घेतला असता बहुतांश लोकांनी बाहेर नदीकाठी शौचाला जात असल्याची माहिती दिली. या शहरात इरई व झरपट या दोन प्रमुख नद्या आहेत. या नद्यांचे पात्र याच कारणाने प्रदूषित झाले आहे. या शहरात आज ४० झोपडपट्टय़ा असून, तेथे महापालिकेची सार्वजनिक शौचालये आहेत. शहरातही ठिकठिकाणी मनपाने सार्वजनिक शौचालये बांधलेली आहेत. याचा उपयोग ज्यांच्या घरी शौचालय नाही, अशा झोपडपट्टीवासियांनी होण्याची गरज आहे. मात्र, झोपडपट्टी परिसरातील लोक नद्या प्रदूषित करत असल्याची वस्तुस्थिती याच सर्वेक्षणातून समोर आली आहे.
विशेष म्हणजे, या सर्वेक्षणातून ६ हजार १९२ चा आकडा समोर आला असला तरी हा आकडा यापेक्षा कितीतरी अधिक असू शकतो, अशी माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. सर्व प्रचार आणि प्रसार माध्यमांवर आज त्याची जाहिरातबाजी मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. कोटय़वधी रुपयांचा चुराडा या अभियानावर केला जात आहे. मात्र, या शहरातील अशांची संख्या बघितली तर मोदी यांचा स्वच्छ भारत अभियानाचा संदेश येथे पोहचलाच नाही, असेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे, महापालिकेत भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्रपक्षांची सत्ता आहे. सर्वपक्षीय सत्ता असतांनाही भाजपला या शहरात नरेंद्र मोदींचा हा संदेश पोहोचविता आलेला नाहीे. चंद्रपूरसारख्या औद्योगिक शहरात ही आकडेवारी निश्चितच थक्क करणारी आहे.

जिल्ह्य़ात ३५६ शाळाबाहय़ मुले
चंद्रपूर जिल्ह्य़ात ३५६ शाळाबाहय़ मुलांची नोंद सर्वेक्षणातून करण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील १ हजार ७०६ गावांतील ५ लाख ३६ हजार ६८६ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण ५ हजार ३७७ शिक्षकांनी पार पाडले. त्यात कधीच शाळेत न गेलेल्या मुलांची संख्या ९५ असून, मध्ये शाळा सोडलेल्या मुलांची संख्या २६१, तर एकूण शाळाबाहय़ मुले ३५६ इतकी आहेत.