कल्पकतेतून स्वच्छता अभियानात विटा अव्वल

विटा शहराने कचराक्त शहर व हागणदारीयुक्त शहर ओडीए प्लस प्लस आदि नामांकने देखील मिळवली आहेत. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील, ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर वैभव पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील, स्वच्छतासेविका शांताबाई हत्तीकर.

दिगंबर शिंदे, लोकसत्ता 

सांगली : सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या नाथांच्या विटा नगरीने देशात स्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात विटा नगरपालिकेने सातत्यपूर्ण कागिरी केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण  स्पर्धेध्ये एक लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत विटा शहराने देशामध्ये प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल  नवी दिल्लीतील विज्ञानभवनात झालेल्या सोहळय़ात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विटा नगरपालिकेचा गौरव झाला. नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई पाटील,माजी नगराध्यक्ष तथा स्वच्छतेचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर अ‍ॅड. वैभव पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील, स्वच्छतासेविका शांताबाई हत्तीकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

विटा शहराने कचराक्त शहर व हागणदारीयुक्त शहर ओडीए प्लस प्लस आदि नामांकने देखील मिळवली आहेत.  स्वच्छ सर्वेक्षण  स्पर्धेमध्ये देशातील ४३२० शहरांनी सहभाग नोंदविला आहे. याध्ये विविध घटकांवरती शहराचे मूल्यांकन केले जाते. याध्ये शहर स्वच्छता, रहिवासी व्यापारी व सार्वजनिक भागाची स्वच्छता, सामुदायिक व सार्वजनिक शौचालय स्वच्छता व व्यवस्थापन, डिजिटल सेवा सुविधा, शहराचे सुशोभीकरण घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, मैला व्यवस्थापन, शहरातील विविध आस्थापना व नागरिकांचा सहभाग व जनजागृती, १०० टक्के कचरा वर्गीकरण,  प्रोसेसिंग, नाले तलाव व्यवस्थापन व स्वच्छता अशा अनेक स्वच्छताविषयक घटकांचा समावेश केला जातो.

स्वच्छतेसाठी प्रयत्न

शहरातील रस्ते दिवसातून दोन वेळा स्वच्छ ठेवण्यात येतात. सार्वजनिक स्वच्छता गृहामध्ये सौरउर्जेवर आधारित प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे जमा केला जातो. या कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया केली जाते. ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जात असून हे खत हरित ब्रॅण्ड नावाने पाच हजार रुपये टन या दराने शेतकऱ्यांना विकले जाते. या खताची गुणवत्ता अव्वल असल्याने खतासाठी  नोंदणी करावी लागते. जमा होणारे प्लॅस्टिक पुनर्वापर करण्यासारखे ते पाठवून उर्वरित प्लॅस्टिक कचर्याचा पेिव्हग ब्लॉकमध्ये व रस्त्याच्या कामामध्ये वापर करण्यात येतो. कचर्यापासून इंधन वायू तयार करून त्यापासून या प्रकल्पासाठी लागणारी वीज उत्पादित केली जाते.

विद्यार्थ्यांकडून जनजागृती

स्वच्छतेसाठी जनजागृती महत्वाची आहे ती विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. यासाठी पहिली ते आठवी पर्यंतच्या मुलांमध्ये प्लॅस्टिक जमा करण्याची स्पर्धा ठेवण्यात आली. दर बुधवारी व शनिवारी बाटली, दूध पिशव्या यासारखा प्लॅस्टिक कचरा जमा करण्याची स्पर्धा ठेवण्यात आली. यासाठी प्लॅस्टिक कोणत्या पध्दतीचे आहे त्यावर ठराविक गुण त्या विद्यार्थ्यांना दिले जात. त्या गुणाच्या आधारावरच मुल्यांकन करून त्यावर बक्षिसे ठेवण्यात आली. याचा फायदा मुलांमध्ये स्वच्छतेची सवय लागण्याबरोबरच शहराच्या स्वच्छतेमध्ये झाला.   कचऱ्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम पटवून देण्यामुळे जागा दिसेल तिथे कचरा टाकण्याची सवय मोडण्यात यश आले. कचरा संकलन करावेच लागू नये अशी व्यवस्था करण्यात आली.  कॉलनी, भाजी बाजार या ठिकाणी तयार होणारा कचरा जागेवरच नष्ट करता येउ शकतो, यापासून झाडांना सेंद्रिय खत उपलब्ध होऊ शकते याची जाणीव लोकांना करून देण्यात आली.

पर्यावरण पूरक शहर म्हणून लौकिक प्राप्त करण्यासाठी लोकचळवळ उभी करण्यात येणार आहे. हरित पट्टा, लहान बागा, उत्पादक वृक्ष लागवड याला प्राधान्य देण्यासाठी प्रभाग निहाय स्पर्धा ठेवण्यात येईल. घनकचरा व्यवस्थापन करीत असताना सांडपाण्याचा पुनर्वापर करून वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे, शहरात सौरउर्जेचा वापर करण्याला प्राधान्य देण्याचे नियोजन आहे.

अतुल पाटील, मुख्याधिकारी नगर परिषद.

स्वच्छ शहर म्हणून देशात अव्वल स्थान मिळाले हा सर्व विटेकरांचा सन्मान  आहे. यात नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांच्याबरोबरच शालेय मुलांचे योगदान महत्वाचे आहे. यापुढील काळात स्वच्छता मोहीम पुढेही सुरूच राहील याची दक्षता विटेकर घेतील असा विश्वास वाटतो.

वैभव पाटील, ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर.

महिलांना आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची नितांत काळजी तर असतेच, पण स्वच्छतेचीही उपजत गोडी असते. याच गोष्टीचा फायदा घेत हळदीकुंकू समारंभाच्या निमित्ताने महिलांना एकत्र करून अख्खे शहर म्हणजे तुमचे घरच आहे हे पटवून दिले. या यशामध्ये सर्वच नागरिकांचा सहभाग मोलाचा असल्याने घरटी पाच पेढे आणि स्वच्छतेबाबत पुढेही कार्यरत राहण्याचे पत्र पाठविण्यात येणार आहे.

प्रतिभाताई पाटील, नगराध्यक्षा,

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Swachh survekshan 2021 vita ranked first in the category of towns with less than one lakh population zws

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या