स्वामी विवेकानंद जयंतीच्या दिवशी दोन लाख भाविकांची पंगत

या उपक्रमात साधारणपणे शंभर ट्रॅक्टर आणि दोन हजार कार्यकर्ते कार्यरत असतात.

धवल कुलकर्णी 

१२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती देशभरात अनेक ठिकाणी त्यांच्या फोटोला अथवा प्रतिमेला हार घालून आणि आणि बंद हॉलमध्ये व्याख्यान ठेवून नक्की साजरी होईल. परंतु बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यामध्ये स्वामी विवेकानंद यांची जयंती आगळ्या-वेगळ्या प्रकारे साजरी होते.

मेहकरमधल्या विवेकानंद आश्रमात तब्बल दोन लाख भाविक अवघ्या २० मिनिटांमध्ये गव्हाच्या पुऱ्या आणि वांग्याच्या भाजी च्या महाप्रसादाचा लाभ घेतात. हा एक आगळा वेगळा रेकॉर्ड आहे. मेहकर- चिखली रस्त्यावरच्या विवेकानंद आश्रमात चाळीस एकर च्या विस्तीर्ण अशा मैदानात भरणाऱ्या या कार्यक्रमात महाप्रसाद ट्रॅक्टर आणि मेटॅडोर च्या माध्यमातून फिरवला जातो.

यादरम्यान साधारणपणे २५० क्विंटल पुर्‍या आणि आणि तितकीच वांग्याची भाजी एका फटक्यात वाढली जाते. या उपक्रमात साधारणपणे शंभर ट्रॅक्टर आणि दोन हजार कार्यकर्ते कार्यरत असतात.

या उत्सवाची कहाणी मोठी रंजक आहे. १९६५ मध्ये विवेकानंद आश्रमाच्या शुकदास महाराजांनी जातिभेद आणि रोटी भेद मिटवण्यासाठी हा सहभोजनाचा कार्यक्रम सुरू केला.

“आम्ही जयंतीचा सोहळा जानेवारी १५, १६ आणि १७ ला साजरा करू. देशात इतरत्रही जयंती इंग्रजी तिथीप्रमाणे साजरी होत असली तरीसुद्धा आम्ही हा उत्सव मराठी तिथी प्रमाणे साजरा करतो. विवेकानंदांची जयंती म्हणजे आमच्यासाठी सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहे. शुकदास महाराजांचा संदेश होता की माणसात देव पहावा आणि त्याची पूजा करावी. या उत्सवात सर्वधर्मीय सामील होतात” ची माहिती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दिली.

या तीन दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये नामवंतांची व्याख्यान आणि प्रवचन होतात आणि संध्याकाळी गायनाचा कार्यक्रम सुद्धा होतो. इथे आत्तापर्यंत गो. नी. दांडेकर, शिवाजीराव भोसले, माधवराव गडकरी, विद्याधर गोखले, किसन महाराज साखरे, बाबा महाराज सातारकर, जितेंद्र अभिषेकी आणि अरुण दाते यांच्यासारख्या मान्यवरांनी हजेरी लावली आहे. “या अशा कार्यक्रमांतून स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा उदय होतो आणि आणि त्यातून लाखो हजारो युवक प्रेरणा घेतात,” गोरे यांनी सांगितले. सामूहिक पंगतीचा कार्यक्रम शेवटच्या दिवशी होतो. पण तीनही दिवस उत्सवामध्ये भाविकांसाठी अन्नछत्र सुरू असतं. यादरम्यान साधारणपणे चारशे क्विंटलचा गहू वापरला जातो, असे गोरे म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Swami vivekanand birth anniversary special day in buldana dhk

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या