Swapnil Kusale won Bronze in Olympic 2024 : भारताच्या स्वप्नील कुसाळेने आश्चर्यकारक कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. त्याने नेमबाजीत ५० मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले. स्वप्नीलने ५० मीटर रायफल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याचा एकूण स्कोर ४५१.४ होता. तो खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने एकूण तीन पदके जिंकली आहेत. तिन्ही पदके नेमबाजीत आली आहेत.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑलिंपिकवीर स्वप्नील कुसाळेला एक कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर केलं आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “शाब्बास स्वप्नील, तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं. तुझी कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. तू आमचा अभिमान आहेस”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नील कुसाळेचं अभिनंदन केलं. तसेच या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल, असं जाहीर केलं.

हेही वाचा : Swapnil Kusale Won Bronze : धोनीला आदर्श मानणारा करवीरनगरीचा शिलेदार, कोण आहे स्वप्नील कुसाळे? जाणून घ्या

मुख्यंमत्री शिंदे काय म्हणाले?

“स्वप्नीलचे रौप्य पदक अवघ्या ०.१ गुणांनी हुकले आहे. तरीही त्याने कांस्य पदक पटकावल्याने महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. महाराष्ट्राला वैयक्तिक कामगिरीसाठी ७२ वर्षांनी पदक मिळाले आहे. या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. त्याचा आणि त्याचे प्रशिक्षक, आई-वडील यांचा यथोचित सत्कारही केला जाईल. याशिवाय स्वप्नीलला नेमबाजीतील पुढील तयारीसाठी आवश्यक, त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. स्वप्नीलने आपल्या कामगिरीने इतिहास रचला आहे. या यशासाठी कुसाळे कुटुंबियांसह, त्याला मार्गदर्शन करणारे, प्रशिक्षक आदींची मेहनत महत्वाची ठरली आहे.”

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून नेमबाजी स्वप्नीलचे हे यश आनंददायी आहे. स्वप्नीलचा महाराष्ट्राला अभिमान आहे. नेमबाजीतील या क्रीडा प्रकारात पदक पटकावणारा स्वप्नील एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. आपण राज्यातील विविध क्रीडा प्रकारांसाठी खेळाडू, प्रशिक्षक यांच्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहोत. राज्यातील क्रीडा संकुलांच्या सुविधांचाही विस्तार करत आहोत. ऑलिंपिकहून परतल्यानंतर स्वप्नीलचे महाराष्ट्रात स्वागत आणि यथोचित सत्कार केला जाईल”, असेही त्यांनी सांगितले.

ऑलिंपिकवीर स्वप्नील म्हणाला की, “पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्येच सराव करताना नेमबाजीचा चांगला पाया घातला गेला. माझ्या यशात कुटुंबियांसह, आईच्या मायेने प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षक श्रीमती देशपांडे यांचा मोला वाटा आहे.”