मागील वर्षीच्या तुलनेत बारा पटीने मृत्यू

महेश बोकडे, नागपूर</strong>

राज्यात मागील वर्षी १ जानेवारी  ते १७ मार्च २०१८ दरम्यान आढळून आलेल्या एकूण स्वाईन फ्लू रुग्णांच्या तुलनेत यंदा २०१९ मध्ये याच कालावधीत अडीच पटीने रुग्ण वाढले आहेत, तर मृत्यूही बारा पट अधिक  नोंदवले गेले आहेत. हा विषाणूजन्य आजार रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्यांमध्ये पसरतो. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान आजार पसरण्याचा धोका वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.

१ जानेवारी २०१८ ते १७ मार्च २०१८ दरम्यानच्या अडीच महिन्यात एकूण ८१२ स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले होते. त्यात ५ जण उपचारादरम्यान दगावले होते.  २०१९ मध्ये याच काळात रुग्णसंख्या अडीच पटींनी वाढून २ हजार २७६ वर पोहोचली आहे. या काळात ६४ मृत्यू नोंदवले गेले असून सर्वाधिक २२ मृत्यू हे केवळ नागपूर विभागातील आणि त्यातील  १३ मृत्यू नागपूर शहरातील आहेत. शहरात सर्वाधिक मृत्यू होत असतानाही महापालिकेचा आरोग्य विभाग जनजागृती पलीकडे काहीही करीत नाही. २०१८ मध्ये सर्वाधिक ४२८ स्वाईन फ्लूग्रस्त पुणे विभागात आढळले होते. त्यात १ रुग्ण दगावला होता.

२०१९ मध्ये सर्वाधिक ७६० रुग्ण पुणे विभागात आढळले असून त्यात १६ जण दगावले. नागपूर विभागात २३८ रुग्ण आढळले असले तरी राज्यातील सर्वाधिक २२ मृत्यू नोंदवण्यात आले.

स्वाईन फ्लू हा विषाणूजन्य आजार त्याच्या संपर्कात येणाऱ्यांमध्येही पसरण्याचा धोका असून मेडिकलच्या एका डॉक्टरला हा आजार झाला आहे.  त्यामुळे लोकसभा निवडणूक प्रचारात स्वाईन फ्लू  रुग्णाच्या संपर्कातील नागरिक आल्यास  इतरांनाही हा आजार होऊ शकतो.

‘‘राज्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढले आहेत. मार्चनंतर ते आणखी वाढू शकतात. आजारावर नियंत्रणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून जिल्हा आरोग्य केंद्रापर्यंत सर्व रुग्णालयांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच औषधांसह प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनीही या आजारापासून दूर राहण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, शिंकताना तोंडावर रुमाल बांधावा, वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवावे.’’

– डॉ. प्रकाश भोई, सहसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग, पुणे