स्वाइन फ्लूच्या आजाराने आष्टी तालुक्यातील मातावळी येथील राजेंद्र बांगर या तरुणाचा मृत्यू झाला. बांगर कुटुंबातील अन्य सदस्यांनाही स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे उघडकीस आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अवकाळी पावसानंतर निर्माण झालेल्या थंड वातावरणात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत स्वाइन फ्लूचे ४० संशयित रुग्ण आढळून आले. यातील १३ जणांना याची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्षामध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून, रुग्णांना स्वाइन फ्लू प्रतिबंधक गोळ्या व औषधे तत्काळ मिळावीत, या साठी चार औषधी दुकानांवर ती उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
जिल्ह्यात बाहेरून आलेल्या रुग्णांमुळे स्वाइन फ्लूची लागण अनेक ठिकाणी झाल्याचे उघड होत आहे. सरकारी व खासगी रुग्णालयांत सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने जवळपास ४० रुग्ण दाखल झाले. पकी १३ रुग्णांना लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्षामध्ये व अंबाजोगाई सरकारी रुग्णालयात या रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
आष्टी तालुक्यातील मातावळी येथील राजेंद्र प्रभाकर बांगर (वय ३५) या तरुणाला ५ दिवसांपूर्वी सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने जामखेडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आजारात फरक पडत नसल्याने नगरला हलविण्यात आले असता वाटेतच त्याचा मृत्यू झाला. बांगर यांची पत्नी, मुलगा यांनाही त्रास होऊ लागल्यामुळे नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत असल्याने वातावरणात गारवा तयार झाला आहे. हे वातावरण स्वाइन फ्लूच्या साथीला पोषक असल्याने प्रादुर्भाव वाढू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.