शुक्रवारी व शनिवारी सलग दोन दिवस महिला व पुरुष शेतकऱ्यांचे बळी घेणारे वाघाचे शावक ट्रैंक्यूलाइज करुन जेरबंद करण्यात ताडोबाच्या आर आर टी टीमला सोमवारी रात्री उशिरा यश आले आहे.
शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ऊन्हाळी धान पिकाला पाणी देण्यासाठी त्याचे ऐवजी गेलेल्या महिला शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करुन ठार केले. या घटनेची शाई वाळण्याच्या आत २४ तासांत घडलेल्या दुसऱ्या घटनेत अरसोड्यापासून एक ते दीड किमी अंतरावर आरमोरी शहरानजीक वडसा मार्गावर कोसा प्रकल्पाजवळ शनिवारी सकाळी साडे सात वाजताचे सुमारास ऊन्हाळी धान पिकाला पाणी देण्यासाठी शेतावर गेलेल्या नंदू गोपाळा मेश्राम वय ५० राहणार बर्डी वार्ड आरमोरी या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला चढवून त्यास ठार केले होते.
या घटनेनंतर परिसरात तीव्र आक्रोश निर्माण झाला होता वाघाचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी रविवारी सुटी असताना देखील संतप्त नागरिकांचा सर्वपक्षीय मोर्चा वनविभागावर काढण्यात आला. रविवारी लगेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील शार्पशुटरसह नऊ जणांची टीम या क्षेत्रात तैनात करण्यात आली. त्यांनी २४ तासांत नियोजनबद्ध कार्यक्रम राबवित सोमवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या सुमारास वाघाच्या बछड्यास ट्रैंक्यूलाइज करीत यशस्वीपणे जेरबंद केले आहे. हा बछडा साधारणतः सोळा ते अठरा महिण्यांचा असल्याचे समजते. तो नुकताच शिकार करण्यास शिकला असल्यामुळे अनियंत्रित पद्धतीने शिकार करणे सुरू केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही कामगिरी यशस्वी करण्यासाठी ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रविकिरण खोब्रागडे, शार्पशुटर अजय मराठे, अतुल मोहूर्ले, भोजराज दांडेकर, अमोल तिखत, सुनील नन्नावरे, अमोल कोरपे,अक्षय दांडेकर, संतोष तिजारे आणि मन्नान शेख यांनी अथक परिश्रम घेतले.