“भाजपाचा पैसा घ्या आणि महाविकास आघाडीला मतदान करा”; भरसभेत अमोल मिटकरींचा वादग्रस्त सल्ला

दिवाळी आहे, लक्ष्मीला नाही म्हणू नका, असेही अमोल मिटकरींनी म्हटले आहे.

Take BJP money and vote for Mahavikas Aghadi Controversial advice from Amol Mitkari
(फोटो सौजन्य : अमोल मिटकरी/ फेसबुक)

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी लक्ष्मीपूजनाचा आधार घेत मतदारांना वादग्रस्त सल्ला दिला आहे. पैसा कोणाचाही घ्या, पण मतदान महाविकास आघाडीलाच करा असे विधान अमोल मिटकरी यांनी केले आहे. देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीच्या प्रचारादरम्यान एका सभेत अमोल मिटकरी यांनी हे वक्तव्य केले आहे.

“पंढरपूरमध्ये जी चूक मतदार राजाकडून घडली माझी इथल्या मतदारांना विनंती आहे ही चूक घडू देऊ नका. तुमचं मत मीठ मिरची एवढे स्वस्त समजून या दलालांपुढे गहाण ठेवू नका. त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत. त्यांचे एक एक कार्यालय ३० हजार कोटींचे आहे. आता दिवाळी आहे. आलाच पैसा तर लक्ष्मीला नाही म्हणू नका. फटाके, फराळ घ्या. भाजपाचा पैसा घ्यायचा पण काँग्रेसला मतदान करायचे,” असे वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केले आहे.

याआधी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतदारांना अजब ऑफर दिली होती. ज्या गावात भाजपाला एकूण मतदानाच्या ७० टक्के मतं मिळतील, तिथे माझ्याकडून गावजेवण घातलं जाईल, असं पाटील म्हणाले होते. त्यासोबतच, ज्या प्रभागांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होईल, तिथल्या अध्यक्षांना विशेष बक्षीस देखील दिलं जाईल, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. विशेषत: या सर्व गावांमध्ये गावजेवणाला आपण स्वत: उपस्थित राहणार असल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं होतं.

नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३० ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी असेल. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं करोनामुळे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी मतदान जाहीर झाल्यामुळे आता राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे.

नांदेडच्या देगलूर विधानसभा मतदारसंघात २००९च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर निवडून आले होते. पण २०१४ च्या निवडणुकीत इथल्या मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात आपलं मत टाकलं. तिथे सुभाष साबणे आमदार म्हणून निवडून आले. २०१९मध्ये काँग्रेसनं हा मतदारसंघ पुन्हा जिंकत रावसाहेब अंतापूरकर आमदार झाले. मात्र, त्यांच्या निधनानंतर तिथे पुन्हा निवडणुका लागल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Take bjp money and vote for mahavikas aghadi controversial advice from amol mitkari abn

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?