Premium

“पत्रकारांना चहा प्यायला न्या”, बावनकुळेंच्या विधानावर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, “भाजपाने एकतर…”

पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात (भाजपा) बातम्या छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचं म्हणजे काय ते तुम्हाला समजलंच असेल, असं बावनकुळे म्हणाले.

Supriya Sule
सुप्रिया सुळेंची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका (संग्रहित छायाचित्र)

भाजपाविरोधात पत्रकारांनी बातम्या छापू नयेत, म्हणून पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना चहा प्यायला न्यावं, ढाब्यावर जेवायला न्यावं, असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमुळे त्यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. यावरून राज्यभरात गदारोळ झाला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले होते?

अहमदनगरच्या सावेडी येथे पदाधिकारी आणि बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. बावनकुळे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसंदर्भात मार्गदर्शन केलं. “पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात (भाजपा) बातम्या छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचं म्हणजे काय ते तुम्हाला समजलंच असेल. तसेच पत्रकारांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा. तुम्ही ज्या बूथवर काम करताय. त्या बूथवर इलेक्ट्रॉनिक मीडियावाला कोण आहे? त्याची माहिती घ्या. आपण इतकं चांगलं काम करतो, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपल्या बूथवर जे चार-पाच कलाकार पत्रकार आहेत, त्यांची यादी बनवा. या पत्रकारांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा. त्यांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात लिहू नये यासाठी त्यांना चहा प्यायला बोलवा. चहा प्यायला बोलावणे म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे. त्यांना ढाब्यावर वगैरे घेऊन जायचं. त्यांना व्यवस्थित सांभाळून ठेवायचं. आपल्याविरोधात एकही बातमी आली नाही पाहिजे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा >> “पत्रकारांनी आपल्याविरोधात बातमी छापू नये, यासाठी…”, भाजपा पदाधिकाऱ्यांना दिलेल्या सल्ल्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण, म्हणाले…

सुप्रिया सुळेंनी काय दिली प्रतिक्रिया

विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला हे मान्य नाही‌. लोकशाहीत वर्तमानपत्रे ही विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात ही अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे.

ज्याअर्थी चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्रकारांना निर्भिडपणे काम करू द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे. भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी‌.

चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं स्पष्टीकरण

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (२५ सप्टेंबर) प्रसारमाध्यमांशी बोलताना या व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत स्पष्टीकरण दिलं. बावनकुळे म्हणाले, मी ते असंच बोललो. मी त्यांना बोललो की बाबा रे, आपण एवढं चांगलं काम करतो. पंतप्रधान मोदी यांनी नऊ वर्षात एवढं चांगलं काम केलं आहे. तरी आपल्याबद्दल नकारात्मक बातम्या येतात. त्यामुळे पत्रकारांबरोबर बसा, त्यांचा सन्मान करा. त्यांना चहा प्यायला घेऊन जा, तुम्ही त्यांना चहासाठी बोलवा किंवा तुम्ही त्यांच्याकडे जा. त्यांना खरी वस्तूस्थिती सांगा. शेवटी पत्रकार हे आपल्या व्यवस्थेचा चौथा संभ आहेत. त्यांना सन्मान देऊन त्यांच्याबरोबर चांगलं वागा. या पद्धतीचा सल्ला मी पदाधिकाऱ्यांना दिला. याच्यात काही वाईट नव्हतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Take journalists to drink tea supriya sules angry reaction to bawankules statement bjp either sgk

First published on: 25-09-2023 at 14:28 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा