पुण्यातल्या एका कर्मचाऱ्याने भर पावसात वर्क फ्रॉम होम नाकारलं कसं गेलं यासंदर्भातली एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एवढंच नाही तर मॅनेजरशी जे बोलणं झालंय त्याचा स्क्रीन शॉटही या पोस्टसह शेअर करण्यात आलं आहे. मी घरुन काम करु का? असं या कर्मचाऱ्याने मॅनेजरला विचारलं. मात्र मॅनेजरने तू बसने वगैरे ऑफिसला ये. बस बंद असतील रिक्षाने ये, रिक्षा बंद असतील तर उबर करुन ये असं म्हटलंय. ही पोस्ट व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
कर्मचाऱ्याने केलेल्या पोस्टनुसार पुण्यात पाऊस पडत होता. त्यामुळे या कर्मचाऱ्याने मॅनेजरला फोन केला. त्याने हे सांगितलं की सर पुण्यात पाऊस पडतोय. अनेक भागांमध्ये पाणी साठलं आहे. अशा वेळी मला ऑफिसपर्यंत प्रवास करत येणं शक्य नाही. मी विनंती करतो की मला आज घरुन काम करण्याची मुभा द्यावी. त्यावर मॅनेजरने त्याला सांगितलं की तुला घरुन काम करण्याची संमती देणं हे आपल्या कंपनीच्या धोरणाच्या विरोधात आहे. मी तुला अशी काही संमती देऊ शकत नाही. तू सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरुन ऑफिसला ये. बस किंवा रिक्षा करुन ये. ते नसेल मिळत तर उबरने ऑफिसला ये. मी काय किंवा ऑफिसमधले इतर लोक काय सगळे ट्रेन, रिक्षा किंवा बसने आलेच आहेत. तू पण ऑफिसला ये, मी तुला वर्क फ्रॉम होम देऊ शकत नाही. असं या मॅनेजरने म्हटलं आहे. या कर्मचाऱ्याच्या मित्राने पोस्ट लिहून व्हॉट्स अॅप चॅट शेअर केले. त्यात त्याने हा प्रश्नही विचारला की अशा वेळी कर्मचाऱ्यांनी राजीनामा का देऊ नये? हा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर पोस्ट केल्याने व्हायरल झाला. ज्यानंतर यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नेटकऱ्यांनी या पोस्टवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत
एक नेटकरी म्हणतो घरुन काम का नाकारलं जातं आहे? जर इतका पाऊस पडतोय तर ऑफिसचं धोरण नाही हे काय ऐकवलं जातं आहे? दुसरा एक युजर म्हणतो असल्या ऑफिसमध्ये किंवा कंपनीत लोक काम कसं काय करतात? पाऊस पडतोय त्यामुळे तो घरुन काम मागतोय ना.. उबर करुन ये हे सांगण्यात काय शहाणपणा आहे? तिसरा एक युजर म्हणतो कंपन्यांनी त्यांचं धोरण लवचिक ठेवलं तर काय बिघडणार आहे? जर पाऊस पडतोय, सखल भागांमध्ये पाणी साठलंय तरीही तुम्ही कंपनीची पॉलिसी नाही म्हणून वर्क फ्रॉम होम नाकारणार, त्यापेक्षा तुमची पॉलिसी बदला ते जास्त सोपं आहे.
