सावंतवाडी: कणकवली, वैभववाडी आणि देवगड या तीनही तालुक्यांना जोडणारे आणि राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेले तळेरे हा स्वतंत्र तालुका होणारच, असा विश्वास जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर यांनी व्यक्त केला. नियोजित तळेरे तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने कासार्डे येथील स्मित लॉन्स येथे आयोजित महामेळाव्यात त्या बोलत होत्या.

​मेळाव्याचे उद्घाटन अनुराधा नारकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने, तर कणकवली सभापती हर्षदा वाळके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र गीत तर शेवटी वंदे मातरम् झाले.

​यावेळी व्यासपीठावर जि.प. सदस्य प्राची इस्वलकर, पंचायत समिती सदस्य राजेश जाधव, सहदेव खाडये, समृद्धी चव्हाण, सादिक डोंगरकर, माजी बांधकाम सभापती रवींद्र जठार, संजय देसाई, सुधीर नकाशे, माजी सभापती संतोष कानडे, प्रकाश पारकर, बंड्या मांजरेकर, माजी सभापती दिलीप तळेकर, देवगड मंडल अध्यक्ष बंड्या नारकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, कृती समिती अध्यक्ष राजू जठार, मुंबई अध्यक्ष सूर्यकांत तळेकर, माजी पं.स. सदस्य विष्णू घाडी, सरपंच हनुमंत तळेकर, ॲड. प्रसाद करंदीकर, अशोक तळेकर यांच्यासह तीनही तालुक्यातील लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​मेळाव्यात मार्गदर्शन करताना डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी तालुका निर्मितीच्या निकषांची माहिती दिली. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी ४० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर लागू नये, प्रशासकीय कामांसाठी आवश्यक असणाऱ्या ११ इमारतींसाठी तळेरे येथे जागा उपलब्ध असणे, लोकसंख्या आणि आसपासच्या गावांचा सहभाग या सर्व अटी तळेरे भाग पूर्ण करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पालकमंत्री नितेश राणे यांनी तळेरे तालुक्याचे निर्माते व्हावे, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

​कणकवली सभापती हर्षदा वाळके यांनी, देवगड लगतच्या गावातील नागरिकांना व शासकीय कर्मचाऱ्यांना देवगडला जाण्यासाठी तळेरे आणि नांदगाव असा मोठा प्रवास करावा लागतो. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या तळेरे तालुका होणे सर्वांसाठीच सोयीचे ठरेल, असे नमूद केले.

​याप्रसंगी प्रकाश पारकर, सादिक डोंगरकर, रवींद्र जठार, प्राची इस्वलकर, संतोष कानडे, ॲड. प्रसाद करंदीकर, अशोक तळेकर, सुभाष उरणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू जठार यांनी केले, सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी केले तर आभार दिलीप तळेकर यांनी मानले.

​हात उंचावून तालुका मागणीला पाठिंबा

उपस्थित सर्व ग्रामस्थांनी “तळेरे तालुका झालाच पाहिजे” अशा घोषणा देत आणि हात उंचावून मागणीला पूर्ण पाठिंबा दर्शविला. मेळाव्यात ‘तळेरे तालुका झालाच पाहिजे’ असा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला.

नियोजित तळेरे तालुका कृती समितीच्या माध्यमातून पुढील कामकाजासाठी प्रत्येक गावातून प्रतिनिधी घेऊन लवकरच जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.