अलिबाग – निसर्गरम्य ताम्हिणी घाटातून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. अपघातांच्या घटनामुळे चर्चेत असलेला हा घाट आता हत्या प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. घाटपरीसरातील जंगलात एका आडमार्गावर तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे.
वर्षा सहलीसाठी प्रसिध्द असलेला ताम्हिणी घाट सध्या नको त्या कारणांसाठी चर्चेत आहे. सततच्या अपघातांमुळे हा घाट जिवघेणा ठरू लागला आहे. तर आता गुन्हेगारी कारवायांसाठी या घाटाचा वापर केला जात असल्याची बाब समोर आली आहे. सोमवारी सकाळी घाटातील जंगल परिसरात आडमार्गावर एका २५ ते ३० वयोगटातील तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह निर्जन ठिकाणी टाकून दिल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या परीसरात खळबळ उडाली आहे.
ताम्हिणी घाट परिसरातील स्थानिक ग्रामस्थ आपल्या नातेवाईकांना जमिन दाखवण्यासाठी निघाले होते. घनदाट झाडीतून जात असतांना एका ठिकाणी त्यांना तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला. ही बाब लक्षात येताच त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्याला या घटनेची वर्दी दिली. माणगाव पोलीसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. आणि शवविच्छेदनासाठी तो माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. मृतदेहाची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.
धारधार शस्त्राने तरुणावर अनेक वार करून त्याची हत्या करण्यात आली, आणि त्यानंतर त्याचा मृतदेह पुरवा नष्ट करण्याच्या उद्देशाने ताम्हिणी घाटातील जंगलात टाकून दिला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीय सध्या सुरू असून, घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीसांनी तपास सुरू केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा ताम्हिणी घाट अपघातांच्या मालिकांमुळे चर्चेत होता. आता हत्याप्रकरण या ठिकाणी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासाची मागणी केली जात आहे. गेल्या वर्षी पेण तालुक्यातील भोगावती पुलाजवळ एका सुटकेस मध्ये एका तरुणीचा मृतदेह अशाच पध्दतीने निर्जन ठिकाणी टाकून देण्यात आला होता. या गुन्ह्याची उकल महिलेची ओळख पटू न शकल्याने, होऊ शकली नव्हती. आता पुन्हा एकदा अज्ञात तरुणाचा मृतदेह ताम्हिणी घाटात सापडल्याने, खळबळ उडाली आहे. सतत घडणाऱ्या या घटनामुळे दहशतीचे वातावरण आहे.
