शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा माजी मंत्री तानाजी सावंत कायम कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. आता तानाजी सावंत हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या २०२५ च्या पीक विमा भरपाईतील झालेल्या तफावतीवरून तानाजी सावंत हे वाशी तालुक्यातील तहसीलदारांवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले आहेत. तानाजी सावंत आणि संबंधित तहसीलदार यांच्यातील संवादाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीक विम्याच्या भरपाईमध्ये होणाऱ्या तफावतीवरून तानाजी सावंत यांनी तहसीलदारांना फोनवरून जाब विचारला. मात्र, त्यानंतर तहसीलदारांनी दिलेल्या उत्तरानंतर तानाजी सावंत हे तहसीलदारांवर चांगलेच कडाडले. ‘बघून घेतो म्हणजे काय? इथे लोकांचे संसार जळायला लागलेत’, अशा शब्दांत तानाजी सावंत यांनी संताप व्यक्त केला.

तानाजी सावंत काय म्हणाले?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तानाजी सावंत हे फोनवरून तहसीलदारांशी बोलताना दिसत आहेत. यावेळी तानाजी सावंत म्हणता की, “तहसीलदार साहेब आपल्याला आता वाशीमध्ये येऊन किती वर्ष झाले? दोन वर्ष बरोबर ना, मग शेतकऱ्यांच्या पीक विम्यात एवढी तफावत कशी? शेजारच्या गटाला २० हजार रुपये पीक विमा मिळतो आणि आमच्या गटातील शेतकऱ्यांना ५००, ७००, २०० आणि २५०० रुपये एवढा पीक विमा कसा? एवढी तफावत कशी?”, असा सवाल आमदार तानाजी सावंत यांनी केला.

तानाजी सावंत यांच्या या प्रश्नावर उत्तर देताना तहसीलदार फोनवरून म्हणतात की, “बघून घेतो.” तहसीलदारांच्या ‘बघून घेतो’ या उत्तरानंतर तानाजी सावंत चांगलेच भडकतात. त्यानंतर तानाजी सावंत म्हणतात की, “बघून घेतो म्हणजे काय? सर हे लोक आत्महत्या करतील. बघून घेतो म्हणजे काय? आतापर्यंतआंदोलन सुरू होते, तुम्ही पाहिलं नाही का? हा विषय तुमच्याकडे मागच्या आठवड्यात आला, मग तुम्ही काय केलं? याचा अर्थ तुम्ही याबाबतीत संवेदनशील नाहीत. इथे लोकांचे संसार जळायला लागेत, तुम्ही असं काय करता? हे प्रकरण तुमच्या समोर येण्याच्या आधीच तुम्ही यावर कार्यवाही करणं गरजेचं आहे”, अशा शब्दांत तानाजी सावंत यांनी तहसीलदारांना सुनावलं.

“काय चुका झाल्या, काय नाही? याबाबत संबंधित विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना बोलून घ्या. बघतो, करतो, माहिती नाही, असं कसं चालेल? तुम्ही यामध्ये लक्ष घाला, मला दोन दिवसांत अहवाल पाहिजे. संबंधित विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना बोलून तुम्हाला काय प्रक्रिया करायची ते करा”, असं सांगत तानाजी सावंत यांनी तहसीलदारांना शेतकऱ्यांना जास्त भरपाई मिळण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.