बंद पडलेला राहुरी येथील डॉ. तनपुरे साखर कारखाना येत्या गळीत हंगामात सुरू करण्यात येईल, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिले. कारखाना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी चालविण्यास घेण्याची तयारी दर्शविली होती. मात्र त्यासंबंधी कर्डिले यांनी कोणतीही भूमिका व्यक्त केली नाही.
डॉ. तनपुरे कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी कर्डिले यांनी गुरुवारी कार्यस्थळावर बैठक आयोजित केली होती. बैठकीस काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, प्रशासक तथा जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे, शिवाजी गाडे, रामदास धुमाळ, रावसाहेब साबळे, राष्ट्रवादीचे अरुण कडू, सुभाष पाटील, आसाराम ढूस, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, अमृत धुमाळ उपस्थित होते. मात्र शिवसेनेचे माजी आमदार प्रसाद तनपुरे व त्यांचे समर्थक अनुपस्थित होते.
कर्डिले म्हणाले, कारखाना चालविण्यास देताना शेतकरी व कामगारांचे देणे देण्याची अट घालण्यात येईल. खासगी संस्था पुढे आली नाहीतर सरकारकडे प्रयत्न करू. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री राम िशदे यांना भेटून मार्ग काढू. कारखाना चालू करणे हे आपले उद्दिष्ट आहे. त्यात राजकारण आणले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. कारखाना कोणी बंद पाडला, कोणाची सत्ता असताना काय झाले, याची चर्चा करण्याची आता वेळ नाही. मागील काळे कोळसे उगाळत बसण्यापेक्षा सर्वानी एकत्र येऊन मार्ग काढला तर कारखाना सुरू होईल.
विखेंना शह!
बाजार समितीसाठी बोलावलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत डॉ. सुजय विखे यांनी तनपुरे कारखाना चालविण्यास घेण्याची तयारी दर्शविली होती. विखे यांनी बंद पडलेला गणेश कारखाना भाडेतत्त्वावर घेऊन तो चालविला आहे. पण कारखाना त्यांना देण्यास कर्डिले यांनी जाहीर विरोध केला होता. आता बैठक घेऊन त्यांनी भूमिका स्पष्ट केली. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे तनपुरे यांच्याबरोबरच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनाही शह मिळाला आहे.