सावंतवाडी – पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील तारकर्ली येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) कार्यालयाला आज सोमवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत कार्यालयातील संगणक, फर्निचर आणि महत्त्वाचे दस्तऐवज जळून खाक झाले असून, लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एमटीडीसीच्या या कार्यालयातून अचानक धूर येऊ लागला. हे कार्यालय लाकडी बोटीच्या प्रतिकृतीच्या स्वरूपात अत्यंत कलात्मकरीत्या उभारण्यात आले होते. लाकडी बांधकाम असल्याने काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण इमारत आगीच्या विळख्यात सापडली.
आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून काही तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
मोठे नुकसान, जीवितहानी टळली
या दुर्घटनेत कार्यालयातील फर्निचर, महत्त्वाची कागदपत्रे आणि यंत्रणा पूर्णपणे जळून भस्मसात झाली आहे. सुदैवाने ही घटना पहाटेच्या वेळी घडल्याने कार्यालयात कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. पर्यटनाच्या दृष्टीने हे कार्यालय महत्त्वाचे केंद्र मानले जात होते. या आगीच्या घटनेचा अधिक तपास संबंधित विभागाकडून सुरू आहे.

