scorecardresearch

राज्य सरकार ट्विटरवर चालते- तटकरे

कर्जमाफीच्या धोरणाचे समर्थन करताना तटकरे म्हणाले, सन २००७-०८ मध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जरी वारंवार कर्जमाफी नकोच अशी भूमिका घेतली होती, ती योग्यच होती.

narayan rane, congress, sunil tatkare,marathi news, marathi, Marathi news paper
सुनील तटकरे
राज्यातील भाजप सरकारला प्रश्नांची जाणच नाही, शिवाय ते शेतकरी विरोधीही आहेत. प्रश्नांशी त्यांना घेणेदेणे नाही. सरकार केवळ ‘ट्विटर’वरच चालते आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना केली. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली.
एका खासगी कार्यक्रमासाठी तटकरे शनिवारी रात्री नगरमध्ये आले होते. त्यानंतर आज सकाळी ते शिर्डीला रवाना झाले. त्यापूर्वी त्यांच्याशी ‘लोकसत्ता’ने संवाद साधला. महापौर अभिषेक कळमकर यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले. पक्षाचे पदाधिकारी सोमनाथ धूत, अशोक बाबर, किसनराव लोटके, केशव बेरड आदी उपस्थित होते.
कर्जमाफीच्या धोरणाचे समर्थन करताना तटकरे म्हणाले, सन २००७-०८ मध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जरी वारंवार कर्जमाफी नकोच अशी भूमिका घेतली होती, ती योग्यच होती. आताही पक्षाची कर्जमाफीची भूमिका योग्यच आहे. गारपीट, अवकाळी, दुष्काळ असा सलग चार वर्षे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा कर्जमाफीची आवश्यकता आहेच. आताही खरीप हंगामाची चिंता आहे. आता दुबार पेरणी करणेही अशक्य आहे. परंतु सरकार दुबार पेरणीसाठी ६०० रुपये व दुष्काळाच्या नुकसान भरपाईसाठी दीड हजार रुपये देऊन एक प्रकारे चेष्टाच करत आहे.
राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना आमचे व काँग्रेसचे संबंध इतके तणावाचे नव्हते. मात्र उद्धव ठाकरे सरकारमध्ये आहेत की विरोधी पक्षात हेच त्यांना समजेनासे झाले आहे. शिवसेनेने आता सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर काही करून दाखवायला हवे, परंतु ते काहीच करत नाहीत. सरकारला निर्णय घ्यायलाही भाग पाडत नाहीत. केवळ बोलत आहेत.
सरकारच्या यशापयशाचे दोघेही धनी आहेत, परंतु ठाकरे केवळ सरकारवर टीकाटिप्पणी करत आहेत. शेतकरीहितासाठी काही करताना दिसतही नाहीत. सरकारकडून सहकार चळवळ मोडीत काढण्याचे प्रयत्न होत आहेत. कृषी-औद्योगिक क्षेत्रालाही धक्का पोहोचवला जात आहे. यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ट्विटरवर अडकलेले सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरत आहे, अशी टीकाही तटकरे यांनी केली.
काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणेच सध्याचे सरकारही घोटाळय़ात अडकत चालले आहे, यावरील प्रतिक्रियेस मात्र तटकरे यांनी बगल दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिस्थिती सध्या ‘ऑल इज वेल’ आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
केंद्रीय कृषिमंत्र्यांचे उत्तर निंदाजनक
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठय़ा प्रमाणावर होत असतानाही राज्य सरकार केंद्राला चुकीची आकडेवारी, माहिती देत आहे, असेच केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत असल्याकडे तटकरे यांनी लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये प्रेमप्रकरणे, व्यसनाधीनता आदी कारणेही असल्याचे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी संसदेत सांगितले होते. मंत्र्यांचे हे उत्तर निंदाजनक आहे. राज्य सरकार केंद्राला प्रत्यक्ष माहितीच देत नसल्याचे यावरून लक्षात येते, असे तटकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tatkare criticises state govt