सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

कळवण : शिक्षण सेतू अभियानाचे काम सांगितल्याचा राग आल्याने तालुक्यातील विसापूर शासकीय आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षक अनिल देसले यांनी मुख्याध्यापकांना मारहाण केली होती. शासकीय कामात अडचण निर्माण करणे आणि मुख्याध्यापकांना मारहाण केल्याच्या कारणावरून प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी देसले यांना निलंबित के ले आहे.

विसापूर येथील शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यपकांनी एकात्मिक प्रकल्पाधिकारी कळवण तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडे यासंदर्भात तक्रोर के ली होती. शासनाच्या निर्देशानुसार नव्याने अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या शिक्षण सेतू अभियान कामाचे सर्व  शिक्षक वर्गात समसमान वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षक अनिल देसले यांनाही काम देण्यात आले. ते त्यांच्या कामात टाळाटाळ करीत असल्याने त्यांना समजाविण्यात आले असता त्यांनी अरेरावीची भाषा करून हे काम आपले नसून ते आपण करणार नाही, असे सांगितले.

शासकीय कामकाज करीत असताना त्यांनी आपणास लाथाबुक्यांनी मारहाण केली. दोनवेळा टेबल लोटून दाबून धरले. इतर सहकारी शिक्षकांनी त्यांना पकडून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आज मी याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली आहे. माझ्या सेवानिवृत्तीला अवघे ५६ दिवस बाकी आहेत. त्यामुळे शिक्षक देसलेपासून जीवितास धोका आहे. त्यांनी मारहाण केल्याने माझ्या डोळ्यास व इतर ठिकाणी जबर मार बसला आहे. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, मागणी मुख्याध्यापकांनी लेखी स्वरूपात केली. या तक्रोरीनुसार प्रकल्प अधिकारी यांनी प्रथमदर्शनी कर्तव्यात कसूर केल्याचे आढळल्याने अनिल देसले यांचेवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांना शासकीय आश्रमशाळा भोरमाळ ता सुरगाणा हे मुख्यालय देण्यात आले असून मुख्यालय सोडण्यापूर्वी मुख्याध्यापकांची परवानगी घेणे  बंधनकारक केले आहे.