पास करण्यासाठी दोन प्राध्यापकांनी विद्यार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमधील पंचवटीतील महाविद्यालयामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. १२च्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थीनीस पास करण्यासाठी महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांनी विनयभंग करून शरीर सुखाची मागणी केली. याप्रकरणी पिडीत विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर आडगाव पोलिसांनी प्राध्यापकांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या दोन्ही प्राध्यापकांना अटक केली आहे. महाविद्यालयातील प्राचार्याने हा आरोप फेटाळून लावला आहे. विद्यार्थिनीने खोटी तक्रार केल्याचे पत्र प्राचार्यांनी पोलिसांना दिले आहे़.

संशयित प्राध्यापक प्रवीण दादाजी सूर्यवंशी व सचिन निशिकांत सोनवणे यांनी संबंधित विद्यार्थिनीस १२ मध्ये नापास झालेल्या विषयात पास व्हायचे असल्यास तिच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी केली. तसेच प्रात्येक्षक सुरू असताना विद्यार्थीनीचा विनयभंग केला. १ जानेवारी २०१५ पासून ते १८ सप्टेंबर २०१८ असा सुमारे तीन वर्षांपासून दोन्ही प्राध्यापकांकडून सुरू असलेल्या त्रासास कंटाळलेल्या पिडीत विद्यार्थिनीने पालकांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी मंगळवारी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत प्राध्यापकांविरोधात तक्रार केली.