आज ५ सप्टेंबर. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या लेखात शिक्षकांचे महत्त्व उलगडून दाखवले आहे.

शिक्षक विद्यार्थ्यांचे भवितव्य साकारत असतात. या शिक्षक दिनानिमित्त, आपल्या कोट्यवधी विद्यार्थ्यांचे जीवन ज्ञान, कौशल्ये, मूल्यांनी परिपूर्ण करणार्‍या आणि त्यांना प्रेरणा देणार्‍या शिक्षकांबद्दल सर्व भारतीयांच्या वतीने, मी कृतज्ञता व्यक्त करते.

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान, प्रसिद्ध लेखक आणि आदरणीय मुत्सद्दी होते; मात्र तरीही त्यांनी शिक्षक म्हणून असलेली आपली भूमिका इतर सर्व भूमिकांपेक्षा सर्वात महत्त्वाची मानली. राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना एकदा विचारण्यात आले होते की, लोक त्यांना वैज्ञानिक म्हणून अधिक लक्षात ठेवतील की राष्ट्रपती म्हणून? त्यावर डॉ. कलाम यांनी उत्तर दिले होते की, त्यांना एक शिक्षक म्हणून लोकांच्या स्मरणात राहायला आवडेल.

आपले कौशल्य आणि चारित्र्यामुळे वंदनीय ठरणारे आणि ज्यांच्याप्रति समस्त विद्यार्थी समर्पित असतात असे शिक्षक नेहमीच आपले आदर्श राहिले आहेत. शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांवर स्वत:च्या मुलांप्रमाणे प्रेम केले पाहिजे, त्यांनी सर्वांना समान आणि न्याय्य वागणूक दिली पाहिजे, त्यांनी विद्यार्थ्यांवर रागवू नये, त्यांनी संयम बाळगावा, विद्यार्थ्यांच्या कल्याणाला प्राधान्य द्यावे आणि विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेनुसार त्यांना शिकवावे, अशी आपल्या प्राचीन ग्रंथांची शिकवण आहे. अशा शिक्षकांविषयी असलेल्या अतिशय सखोल आदराच्या भावनेतूनच, सुमारे तीन सहस्र वर्षांपूर्वी तैत्तिरीय उपनिषदातील ‘शिक्षावल्ली’ने ‘आचार्यदेवो भव’ हा कालातीत संदेश दिला होता.

ज्ञानी तसेच अतिशय आपुलकीने मार्गदर्शन करणार्‍या अनेक शिक्षकांचे मार्गदर्शन लाभणे हे माझे परमभाग्य राहिले आहे. सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, पुढील शिक्षणासाठी गावाबाहेर पडणारी मी गावातली पहिली मुलगी होते. नंतर भुवनेश्वरमध्ये शिकत असतानाही मला माझ्या शिक्षकांकडून उदंड प्रेम आणि प्रोत्साहन लाभले. माझ्या शिक्षकांचे जीवन एका सखोल सत्याचे दर्शन घडवते. प्रेमळ आणि समर्पित असा कोणताही शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये असीम क्षमता आणि प्रेरणा जागृत करू शकतो. त्यांच्या प्रोत्साहनामुळे आयुष्यातील कठीण आव्हानांना तोंड देण्याचे धैर्य आणि सर्वोच्च ध्येय गाठण्याचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतो. शिक्षक केवळ अभ्यासक्रमच शिकवत नाहीत, तर ते विद्यार्थ्यांना यशस्वी तसेच अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या कलाकौशल्यांनी परिपूर्ण बनवतात. ते विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असतातच, पण त्याचबरोबर, ते विद्याथ्र्याच्या ज्ञानार्जनाच्या प्रवासातील शुभचिंतक, मित्र आणि सहप्रवासीही असतात.

‘एक चांगला शिक्षक कसा असावा’ याविषयी प्राचीन काळापासून आपल्या संस्कृती आणि परंपरेतून मिळालेला दृष्टिकोन आजही तितकाच महत्त्वपूर्ण आहे. अनेक शतकांपूर्वी महाकवी कालिदासांनी त्यांच्या ‘मालविकाग्निमित्रम्’ या नाटकात लिहिले आहे की, चांगल्या शिक्षकाकडे सखोल ज्ञान असते आणि ते प्रभावीपणे संक्रमित करण्याची क्षमताही असते.

संस्कृतमधील एक प्रसिद्ध सुभाषित आपल्याला सांगते : ‘सर्वत्र विजयम् इच्छेत्, शिष्यात् इच्छेत् पराजयम्’ – माणसाने सर्वत्र विजयाची इच्छा बाळगावी, परंतु स्वत:च्या शिष्याकडून मात्र पराभूत होण्याची इच्छा ठेवावी. विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र विचारांना प्रोत्साहन देणे, त्यांची उत्सुकता जागवणे, प्रश्न विचारण्याच्या वृत्तीला खतपाणी घालणे, त्यांची तर्क आणि निर्णयाची क्षमता तीक्ष्ण करणे, आणि त्यांना एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून घडण्यास मदत करणे हे अध्यापनाचे सर्वात उपयुक्त आणि सन्माननीय पैलू आहेत. अशाच प्रेरणादायी शिक्षणाच्या माध्यमातून आपण यशस्वी उद्योजक, तल्लख शास्त्रज्ञ, सर्जनशील कलाकार आणि तत्कालीन आव्हानांवर नावीन्यपूर्ण उपाय शोधण्यास सक्षम असलेल्या नागरिकांच्या पिढ्या घडवू शकू.

अध्यापन हा केवळ एक व्यवसाय नाही, तर ते एक व्रत आहे. ही केवळ एक कारकीर्द किंवा नोकरी नाही, तर मानवतेला आकार देण्याचे एक पवित्र कार्य आहे. येणार्‍या पिढ्यांचा मार्ग प्रकाशित करण्याची ही एक उदात्त जबाबदारी आहे.

अध्यापनाशी जोडलेल्या माझ्या आठवणी मला एका विशेष समाधानाची अनुभूती देतात. मी ओदिशातील रायरंगपूर येथील श्री ऑरोबिंदो इंटेग्रल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शिकवले आहे. विविध विषय शिकवण्याव्यतिरिक्त, मुलांचे संगीत कार्यक्रम, क्रीडा उपक्रम आणि नाटकांच्या तयारीसाठी मी मदत करत असे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यांची तयारी आणि कार्यक्रमांदरम्यान मुलांमधील आनंदी उत्साहाच्या आठवणी माझ्यासाठी आजही अतिशय सुखावह आहेत. विद्यार्थ्यांना सुंदर नैसर्गिक वातावरणात सहलीला नेण्यात आणि खेळ तसेच शोधाच्या माध्यमातून त्यांना प्राणी, पक्षी, झाडे आणि वनस्पतींच्या जगाची ओळख करून देण्यात मला खूप समाधान लाभले आणि जीवनाचा अर्थ सापडला.

शाळा सोडल्यानंतर अनेक वर्षांनीही माझे विद्यार्थी मला त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमांना आदरपूर्वक आमंत्रित करतात. मला माझ्या अनेक विद्यार्थ्यांची नावेच नव्हे, तर आम्ही त्यांना प्रेमाने ज्या टोपणनावांनी हाक मारायचो ती टोपणनावेही स्पष्टपणे आठवतात. मी ज्या विद्यार्थ्यांना शिकवले त्यांच्याकडून मीसुद्धा खूप काही शिकले आहे. मुलांची उत्स्फूर्तता आणि चिकित्सक वृत्तीमधून शिक्षकही खूप काही शिकत असतात. म्हणूनच विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे विचार व कल्पना समजून घेण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असते.

साधारण अकरा वर्षांपूर्वी, मी माझ्या गावच्या घरी एका निवासी शाळेची स्थापना केली. या शाळेत वंचित कुटुंबांतील विद्यार्थी आणि ज्यांनी आपले आई-वडिलांचे छत्र गमावले आहे अशी बालके शिक्षण घेतात. मी या बालकांना भेटण्यासाठी वेळोवेळी या शाळेला भेट देत असते. या वर्षी, २० जून रोजी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी या बालकांना भेटून मला खूप आनंद झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माझ्याबरोबर या शाळेला भेट दिली आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. त्यांना भेटण्याचा हा असाधारण अनुभव या विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी प्रेरणास्रोत बनेल. त्या मुलांना प्रगती करताना पाहून माझ्या मनात एका विशेष अर्थपूर्णतेची भावना निर्माण होते.

आपल्या विद्यार्थ्यांना एक चांगला माणूस बनवण्यासाठी मार्गदर्शन करणे हे शिक्षकांचे पवित्र कर्तव्य आहे. आपला देश सामाजिक समावेशनाला केंद्रस्थानी ठेवून विकसित भारत बनण्याच्या ध्येयाकडे एका निश्चित गतीने वाटचाल करत आहे. या प्रवासात शिक्षकांनी अशा विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडवाव्यात, ज्या आपल्या सांस्कृतिक वारशाच्या आणि परंपरेच्या समृद्धीला जपतील; वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करतील आणि मानवतेच्या कल्याणासाठी कार्य करतील; ‘अंत्योदय’च्या आदर्शाचे पालन करतील; पर्यावरण आणि सर्व सजीवांचे रक्षण करतील; वैयक्तिक आणि सामूहिक उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करतील

आणि ‘राष्ट्र प्रथम’च्या भावनेने पुढे जातील. आपल्या ध्येयाला वाहून घेतलेल्या आणि अतिशय प्रामाणिकपणे काम करणार्‍या शिक्षकांचा नेहमीच आदर करा, असे माझे देशातील प्रत्येक नागरिकाला आवाहन आहे. अशा ध्येयनिष्ठ शिक्षकांच्या योगदानामुळेच भारत जगाचे नेतृत्व करत राहील, अशी मी मनापासून कामना करते.