शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी विविध शिक्षक संघटना शनिवारी रस्त्यावर उतरल्या. दरम्यान, या मागण्यांची तळी उचलून धरताना संस्थाचालकही रस्त्यावर आले.
राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे शिवाजी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. संगणक परीक्षांना मुदतवाढ मिळावी, वीसपटाच्या आतील शाळा बंद करू नयेत, मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करावी, महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा वयोमर्यादा वाढवावी, सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात, शालार्थ वेतनप्रणालीत सुधारणा व्हावी आदी १५ मागण्यांसाठी एक दिवसाचे धरणे धरण्यात आले. धरणे आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष किशनराव बिराजदार व सरचिटणीस सुनील हाके यांनी केले.
मराठवाडा शिक्षक संघातर्फे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे धरण्यात आले. सरकारचा कारभार शिक्षण व शिक्षकविरोधी असल्याचा आरोप संघटनेने केला. राज्यातील शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी कपात करणारा अध्यादेश रद्द करावा, शिक्षकांना दरमहा १ तारखेला वेतन अदा करावे यासह ९ मागण्या धरणे आंदोलकांनी केल्या. धरणे आंदोलनाचे नेतृत्व पी. एस. घाटगे व विश्वंभर भोसले यांनी केले.
टाऊन हॉल मदानावरून शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या नेतृत्वाखाली संस्थाचालकांनी शिक्षकांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढला. मोर्चात लायक पटेल, कालिदास माने, मोहन हाके यांच्यासह संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले. गेल्या दोन वर्षांपासून अतिरिक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतन दिले नाही, ते तातडीने देण्यात यावे, ही प्रमुख मागणी होती.