नांदेड : शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ ते नरहर कुरुंदकर अशा थोरांची परंपरा सांगणाऱ्या शहरातील पीपल्स कॉलेजला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पथकाने बुधवारी सकाळी आकस्मिक भेट दिली असता, प्राचार्यांसह अनेक प्राध्यापक महाविद्यालयात गैरहजर असल्याचे आढळले.

वरील महाविद्यालयात अलीकडेच ‘नांएसो’च्या एका पदाधिकाऱ्याने उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांशी अत्यंत असभ्य वर्तन केले. एका प्राध्यापकाला शिवीगाळ केली; पण नंतर इतर पदाधिकाऱ्यांनी माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकला होता. वेगवेगळ्या विषयांतील दिगंत कीर्तीचे प्राचार्य, प्राध्यापक लाभलेल्या या महाविद्यालयाचा जुना लौकिक मागील काही वर्षांत मात्र लुप्त झाला आहे.

या पार्श्वभूमीवर ‘स्वाराती मराठवाडा विद्यापीठा’चे प्र-कुलगुरू अशोक महाजन आणि विद्यापीठातील प्रभारी अधिष्ठाता डॉ. डी. एम. खंदारे यांनी बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास पीपल्स कॉलेजला अचानक भेट दिली. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन पंधरवडा झाला आहे. सर्व महाविद्यालये वेळापत्रकानुसार चालतात का, प्राचार्य आणि प्राध्यापकवृंद महाविद्यालयात उपस्थित आहेत का, विद्यार्थी वर्गामध्ये येतात का, याची तपासणी करण्याची मोहीम या महाविद्यालयापासूनच सुरू करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी शेजारच्याच सायन्स कॉलेजमध्ये जाऊन पाहणी केली.

कुलगुरूंच्या महाविद्यालय भेटीची सविस्तर माहिती समोर आली नाही, पण प्र-कुलगुरू डॉ. महाजन कॉलेजमध्ये गेल्यानंतर प्राचार्य डॉ. आर. एम. जाधव यांच्यासह अनेक प्राध्यापक महाविद्यालयात उपस्थित नसल्याचे दिसून आले. या पथकाने प्राध्यापकांची हजेरीपुस्तिका तपासली. वेगवेगळ्या विभागांना भेट दिली. काही वर्गांची प्रत्यक्ष पाहणी केली असता, बहुसंख्य वर्गांमध्ये विद्यार्थी हजर नसल्याचे दिसून आले. पथक आल्याची माहिती मिळताच प्राचार्य घाईघाईने महाविद्यालयामध्ये दाखल झाले. नंतर इतर प्राध्यापकही उपस्थित झाल्याचे दिसून आले. प्र-कुलगुरूंनी महाविद्यालयातील कला आणि वाणिज्य शाखांच्या वेगवेगळ्या विषयांचे वेळापत्रकानुसार वर्ग सुरू आहेत का, याची खातरजमा केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेत सुधारणा व्हावी, तसेच सर्व महाविद्यालयांतील प्राध्यापक आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत की नाही, हे पाहण्यासाठी आम्ही पहिली भेट पीपल्स कॉलेजला दिली. आम्ही महाविद्यालयात गेलो तेव्हा प्राचार्य हजर नव्हते हे खरे आहे, पण ते नंतर दाखल झाले. या भेटीत काही त्रुटी निदर्शनास आल्या. त्याबद्दल महाविद्यालयाला स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.- डॉ. अशोक महाजन,प्र-कुलगुरू, स्वारातीम विद्यापीठ, नांदेड