टीम इंडियाचा विजयी जल्लोष मुंबईत पाहण्यास मिळाला. आपल्या भारतीय क्रिकेट संघाने १७ वर्षांनी टी २० विश्वचषक जिंकला. त्याचं जोरदार सेलिब्रेशन मुंबईत करण्यात आलं. मात्र या खेळाडूंच्या सत्काराचं जे पोस्टर आहे त्या पोस्टरवरुन आज विधानपरिषदेत सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशी खडाजंगी पाहण्यास मिळाली. भाई जगताप यांनी उपस्थित केला पोस्टरचा मुद्दा प्रश्नोत्तराच्या तासांत काँग्रेस आमदार यांनी पोस्टरचा मुद्दा उपस्थित केला. भाई जगताप म्हणाले, "टीम इंडियाच्या सत्काराचं जे पोस्टर आहे टीम इंडियाच्या खेळाडूचं नाव किंवा फोटो काहीही नाही. फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत. विधानसभेसाठी हा विषय अभिमानाचाच आहे. सगळ्यांना बोलवा आपण सगळे टीम इंडियाचं स्वागत करु. मात्र एखादी लिग जिंकल्याप्रमाणे हे असं पोस्टर दाखवलं जातं आहे. हे पोस्टर मी मुद्दाम दाखवत आहे." असं भाई जगताप म्हणाले. त्यानंतर अनिल परब यांनीही त्यांचं म्हणणं मांडलं. अनिल परब काय म्हणाले? "भारताने विश्वचषक जिंकला आहे ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तसंच आपल्या विधीमंडळाने टीम इंडियाचा सत्कार करण्यास ठरवलं आहे. विरोधकही या सभागृहाचे सदस्य आहेत. आम्हाला या सत्कारापासून दूर का ठेवलं जातं आहे? आम्ही भारताचे नागरिक नाही का? जो कार्यक्रम सरकारने आयोजित केला आहे तो विधीमंडळाला अवगत असला पाहिजे इतकीच आमची मागणी आहे. जगज्जेत्यांचं आपण स्वागत करत आहोत. ही चांगलीच गोष्ट आहे, आम्हा विरोधी पक्षातल्या नेत्यांना तुम्ही अशा टोकावर नेऊन ठेवलं की अशा चांगल्या कार्यक्रमातही आम्ही येऊ शकत नाही. हे काही बरोबर नाही. सगळ्यांना निमंत्रण द्या, सोनेरी क्षणांचा आम्हाला भागीदार होऊ द्या इतकंच आमचं म्हणणं आहे." असं अनिल परब म्हणाले. त्यानंतर विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर यांनी या दोन्ही नेत्यांना उत्तर दिलं. हे पण वाचा- भारतीय संघाचा विजयोत्सव पाहून शाहरुख खान झाला थक्क! विराट अन् रोहितचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाला… काय म्हणाले प्रवीण दरेकर? "भाई जगताप आणि अनिल परब यांचा मुद्दा रास्त आहे. सत्कार सोहळ्याचं निमंत्रण सर्वपक्षीय नेत्यांना दिलं पाहिजे. आमचा जो अभिमान आहे तोच त्यांच्यासाठीही अभिमानाचा क्षण आहे. मुंबईत लाखोंचा जनसागर उसळला होता. मात्र बस गुजरातची आहे हेच तुम्हाला दिसली. इतक्या कोत्या मनोवृत्तीचे तुम्ही आहात हे दाखवून दिलं. बरं आता तुम्ही मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेलं पोस्टर दाखवत आहात. तिथे कुणाचा फोटो असला पाहिजे? देश जगज्जेता झाल्यानंतर जर सत्कार सोहळा सरकार आयोजित केला आहे तर तिथे काय शंभर फोटो लागणार का? खोटं नरेटिव्ह तयार करायचं, खोटं बोल पण रेटून बोल करायचं हा तुमचा अजेंडा आहे. आम्ही कोत्या मनोवृत्तीचे नाही." असं दरेकर म्हणाले. ज्यानंतर विरोधकांनी विधान परिषदेत गदारोळ केला. नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या? कुठलाही महत्त्वाचा कार्यक्रम असला की विधान परिषदेत गदारोळ होतो असा मेसेज जातो जे काही योग्य नाही. माझं हे म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा माझ्याकडेही बाजू असेल. मी काही बोलायच्या आधीच तुम्ही गदारोळ करता. की मी सभागृह स्थगित करु? कुणीही आरडाओरडा करु नका. लेखी निमंत्रण मिळालं नाही कारण ते काढलेलं नसावं अशी माझी माहिती आहे. मी कार्यक्रमाची अप्रत्यक्ष संयोजक म्हणून मी सगळ्यांना विनंती करते की टीम इंडियाचे सदस्य येणार आहेत. त्या सत्कार सोहळ्याला तुम्ही सगळ्यांनी उपस्थित रहावं मी माझ्याकडून तुम्हाला निमंत्रण देते आहे असंही नीलम गोऱ्हेंनी म्हटलं आहे. माझं निमंत्रण सर्वांनी गोड मानून घ्यावं. चौथ्या मजल्यावरच्या सेंट्रल हॉलमध्ये कार्यक्रम पार पडणार आहे. असंही नीलम गोऱ्हेंनी म्हटलं आहे.