scorecardresearch

बोगस बियाणे-खतांना आळा घालण्यासाठी कृषी विभागातर्फे भरारी पथके

खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे म्हणून यंत्रणा सज्ज करत असतानाच बोगस बियाणे, खते, किटकनाशके विक्रीवर आळा घालण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आल्याचे कृषी विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

(संग्रहीत छायाचित्र)

रत्नागिरी :   खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे म्हणून यंत्रणा सज्ज करत असतानाच बोगस बियाणे, खते, किटकनाशके विक्रीवर आळा घालण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आल्याचे कृषी विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या नियोजनासाठी येथील अल्पचबचत सभागृहात एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये येत्या खरीप हंगामात राबवण्यात येणारे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, भात व नागली या पिकांच्या लागवडीचे तंत्रज्ञान, सुधारित संकरित वाणाचे बियाणे इत्यादीबाबत  डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विजय दळवी यांनी मार्गदर्शन केले.

भात बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी, युरीया ब्रिकेटसह सिंगल सुपर फॉस्पेटचा सुयोग्य वापर, बीजप्रक्रिया, आंबा बागांचे भौगोलिक मानांकन हे कृषी विभागाचे कार्यक्रम मोहिम स्वरुपात राबवतानाच बोगस बियाणे अथवा खते, किटकनाशके याला आळा घालण्यासाठी भरारी पथकांची स्थापना कृषी विभागाकडून करण्यात आली आहे.

येत्या हंगामात विविध फळझाडांची लागवडीची माहिती रोग-किडींबाबत डॉ. वैभव शिंदे यांनी माहिती दिली. येत्या हंगामात बी-बियाणे, खते आदी उपलब्धेबाबत अजय शेंडे यांनी मार्गदशन केले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळझाडे लागवडीचे पाच हजार हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट साध्य करण्याबाबत नियोजन करण्यात आले.

केंद्र शासनाच्या लघु व सूक्ष्म उद्योग योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याबात उर्मिला चिखले यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रस्ताव भरुन घेण्याची सूचना जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सुनंदा कऱ्हाडे यांनी केली. तसेच या कार्यशाळेत कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. या एकदिवसीय खरीप हंगाम नियोजन पूर्वतयारीच्या कार्यशाळेसाठी जिल्ह्यतील सर्व कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेपासून येत्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कृषी विभागाने सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Teams agriculture department curb seed fertilizers farmers bogus sale ysh

ताज्या बातम्या