अलिबाग – रायगड जिल्ह्यातील २ हजार ६५८ लाभार्थ्यांना घरकुल योजनेतील हप्त्यांची प्रतिक्षा आहे. पोर्टल मधील तांत्रिक बिघाडाचा रायगड जिल्ह्यातील प्रधानमंत्री जनमन योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना बसला आहे.
रायगड जिल्ह्यात तब्बल २० हजार ४८९ घरकुलांच्या भूमिपूजनाचा सोहळा ८ मार्च रोजी महिला दिनी पार पडला. भूमीपूजनाचा मान महिलांना देण्यात आला. यात प्रधानमंत्री जनमन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास, रमाई आवास योजना अशा विविध योजनांचा समावेश आहे. या योजनांमधील लाभार्थ्यांना घरकुल बांधणीसाठीचा पहिला हप्ता मिळाला पण त्यांना आता दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात प्रधानमंत्री जनमन योजनेतील १ हजार १६० तर प्रधानमंत्री आवास योजनेतील १ हजार ४९८ लाभार्थ्यांचे घरकुल बांधणीसाठीच्या दुसऱ्या हप्ता थकला आहे. राष्ट्रीय पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थ्यंचे पैसे थकले असल्याचे सांगीतले जात आहे. मात्र याचा फटका लाभार्थ्यांना बसला आहे. पावसाळ्यापूर्वी नवीन घरकुल बांधून होईल म्हणून योजनेतील लाभार्थ्यांनी घरांचे बांधकाम सुरू केले होते. पहिल्या टप्प्यातील रक्कम या लाभार्थ्यांना वेळेत मिळाली होती. मात्र दुसऱ्या टप्प्यातील रक्कम खात्यावर जमा झाली नाही. त्यामुळे आता उर्वरित घरकुलांची कामे पूर्ण कशी करायची हा प्रश्न लाभार्थ्यांसमोर आहे.
कोकणात पावसाला सुरूवात झाली आहे. घरकुलांची कामे अर्धवट निधी आभावी अर्धवट अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे वारा आणि पावसाचा मारा सहन करत उघड्यावर वास्तव्य करण्याची वेळ या कुटूंबांवर आली आहे. दुसरीकडे रोजगार हमी योजनेतून घरकुल बांधणीसाठी २७ हजार रुपये मिळणे लाभार्थ्यांना अभिप्रेत होते. मात्र ही रक्कमही मिळाली नस्ल्याची बाब समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैषाली पाटील यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची भेट घेतली, घरकुल योजनेचा थकीत हप्ते तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी काही आदिवासी लाभार्थीही उपस्थित होते.
राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात जास्त पाऊस पडतो. त्यामुळे पावसाळ्या पुर्वी घरकुल पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. या कुटूंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून योजनेचा दुसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करायला हवा. – डॉ. वैषाली पाटील, सामाजिक कार्यकर्त्या.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
तांत्रिक अडचणीमुळे राष्ट्रीय पोर्टलवरून लाभार्थ्यांच्या खात्यात दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळू शकलेली नाही. मात्र घरकुलाचा दुसरा हप्ता तातडीने जमा व्हावा यासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. – प्रियदर्शनी मोरे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा.