करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मागील पावणे दीड वर्षांहून अधिक काळापासून राज्यातील धार्मिक मंदिर बंद होती. मात्र नवरात्री सणाचे निमित्ताने पाहिल्याच दिवशी राज्य सरकारने धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचं सर्वांनी स्वागत केली असून त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उघडण्यात आले.

यानंतर भरणे यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली. मात्र त्या पूर्वीच भाविकांची आपल्या लाडक्या गणरायाच दर्शन घेण्यास एकच गर्दी केली होती. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी हे देखील उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, “करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपली मंदिरे पावणे दोन वर्ष बंद होती.आता एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुरू होत आहेत. हे पाहून आपल्या सर्वांना आनंद होत आहे.आता आपण सर्वांनी नियमाचे पालन करून गणरायाच दर्शन घेऊ या आणि या करोना हरवू या.”

मुंबईमध्ये राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सकाळी श्री. महालक्ष्मी मातेचे दर्शन घेतले. सकाळी सात वाजता त्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.

घटस्थापनेपासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसांपासूनच मंदिरांमध्ये भाविक दर्शनासाठी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने मंदिर प्रशासनाने गर्दीच्या व्यवस्थापनाची तयारी केली आहे. करोना प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशातून गर्दी टाळण्यासाठी बंद असलेली मंदिरे गुरुवारपासून खुली होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागासह उपनगरातील मंदिरांमध्येही रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराची साफसफाई आणि परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. निर्माल्य संकलन, भाविकांची तपासणी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासंदर्भातील नियोजन अंतिम टप्प्यामध्ये आले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसह, मंदिरात येणे शक्य नसलेल्या भाविकांसाठी बहुतांश मंदिर प्रमुखांनी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली आहे. 

गर्दीचे व्यवस्थापन…
अनेक मंदिरांनी नवरात्रोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले आहेत. मात्र नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच मंदिरांमध्ये भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने मंदिर प्रशासनांनी गर्दीच्या व्यवस्थापनाची तयारी केली आहे. इतर धार्मिक स्थळांनीही ही काळजी घेतली आहे.

ऑनलाइन दर्शनही…
प्रार्थनास्थळाशी संबंधित व्यक्तींना, कर्मचाऱ्यांना करोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. त्याचबरोबर बहुतांश मंदिर प्रमुखांनी भाविकांसाठी ऑनलाइन दर्शनाचीही व्यवस्था केली आहे.

सतर्कता म्हणून...
गेले वर्षभर बंद असलेली प्रार्थनास्थळे आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आली आहेत. तेथील साफसफाई आणि परिसराचे निर्जंतुकीकरण काटेकोरपणे करण्यात आले आहे. मंदिरात भाविकांसाठी सॅनिटायझर तसेच शारीरिक तापमान घेण्याची सोय केली आहे.