राहाता : रोख रक्कम, दागिने, वाहन याच्या चोरीचे प्रकार सर्वश्रुत आहेत. मात्र, पुणतांबा गावात चक्क १० गाढवांची चोरी झाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास गाढवांच्या चोरीची घटना घडली. याबाबत राहाता पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. गाढवमालकाचे पाच लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यापूर्वीही कोल्हार गावात गाढव चोरीची घटना घडली. गाढव चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा यामागे हात आसल्याची चर्चा आहे.

पुणतांबा गावातील विजय लक्ष्मण गुंजाळ हे गाढवावरून वाळू, मुरूम व माती वाहतुकीचा व्यवसाय करतात. सध्या गोदावरी नदीला पाणी आल्याने त्यांचा व्यवसाय बंद आहे. त्यांनी गाढवे मोकळी सोडली होती. पाळत ठेवलेल्या चोरट्यांनी मध्यरात्री गुंजाळ यांच्या मालकीची १० गाढवे टेम्पोमध्ये घालून चोरून नेली. या चोरीमुळे गुंजाळ यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.

काही महिन्यांपूर्वी पुणतांबा गावात पोलिसांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष ग्रामसभेत गस्त वाढवावी, ग्रामसुरक्षा दल स्थापन करावे, मुख्य चौकात आणखी पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, गावात बेकायदारीत्या राहणाऱ्या लोकांचा तपास करून पोलिसांकडे त्यांचा अहवाल सादर करावा, या विषयांवरील ग्रामसभेत झालेले ठराव, अद्यापि कागदावरच असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. पुणतांबा पोलीस दूरक्षेत्राला दोन गावांचे कार्यक्षेत्र आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल, असा ठराव त्या वेळी झाला होता; परंतु त्यावरही कार्यवाही झाली नाही. कायम उपस्थित राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची गावात नेमणूक करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद

पुणतांब्यातील कोपरगाव रस्त्यावरील एका गॅरेजसमोरील पटांगणात बसलेली १० गाढवे लाल रंगाच्या आयशर टेम्पोमध्ये टाकून सहा चोरट्यांनी चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. चोरी केल्यानंतर टेम्पो कोपरगावच्या दिशेने गेल्याचे दिसत आहे.