राज्यातील दहा जणांना पद्म पुरस्कार ; प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण, नटराजन चंद्रशेखरन, सायरस पूनावाला यांना पद्मभूषण

यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये विविध क्षेत्रांतील ३४ महिलांचा समावेश असून, १३ जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आह़े

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने १२८ पद्म पुरस्कारांची घोषणा केली़  त्यात राज्यातील दहा जणांचा समावेश आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण या दुसऱ्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘टाटा’सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन आणि ‘पूनावाला उद्योग समूहा’चे अध्यक्ष सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

राज्यातील एकाला पद्मविभूषण, दोघांना पद्मभूषण तर सात जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यापैकी डॉ. बालाजी तांबे यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे.

१२८ पद्म पुरस्कारांमध्ये चार पद्मविभूषण, १७ पद्मभूषण आणि १०७ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आह़े  यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये विविध क्षेत्रांतील ३४ महिलांचा समावेश असून, १३ जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आह़े

संरक्षण दलाचे तत्कालीन प्रमुख जनरल बिपीन रावत, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग आणि राधेश्याम खेमका (साहित्य-शिक्षण) यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आह़े

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, प़ बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, कृष्णा इल्ला, सुचित्रा इल्ला, राजीव मेहऋषी, रशीद खान (कला) मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला, गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांच्यासह १७ जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आह़े

प्रल्हाद राय अग्रवाल (व्यापार-उद्योग) नजमा अख्तर (साहित्य-शिक्षण), ज़े क़े बजाज (साहित्य-शिक्षण), ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा नीरज चोप्रा (भालाफेकपटू), नारायण कुरूप (साहित्य-शिक्षण), अवनी लेखारा (नेमबाज), रामसहाय पांडे (कला), शिवनाथ मिश्रा (कला), पद्मजा रेड्डी (कला)  यांच्यासह विविध क्षेत्रातील १०७ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आह़े

लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत़  ‘नाव-गाव कशाला पुसता’, ‘खेळताना रंग बाईचा होळीचा’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला’, ‘राग नका धरू सजना’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘लाडे लाडे बाई करू नका’ अशा एकापेक्षा एक सरस, ठसकेबाज लावणी सुलोचना चव्हाण यांनी गायली आहेत. त्यांना २०१२ साली संगीत नाटक अकादमीचा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

हिंदूीतील प्रसिध्द पार्श्वगायक सोनू निगम यांचीही पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जवळपास तीन दशके हिंदूी चित्रपटसृष्टीत आपल्या सुरेल आवाजाच्या बळावर सोनू निगम यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या सोनू निगम यांनी हिंदूीबरोबरच मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड, तमिळ भोजपुरी, गुजराती अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

१९९१ साली दूरदर्शनवर गाजलेल्या ‘चाणक्य’ या मालिकेचे दिग्दर्शन आणि मुख्य भूमिकेमुळे घराघरात लोकप्रिय ठरलेले डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. द्विवेदी यांनी अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या ‘पृथ्वीराज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

राष्ट्रीय स्तरावर माझ्या कामाची नोंद घेतली गेली याचा आनंद आहे. माझ्या आजवरच्या कामाचे चीज झाल्याची भावना आहे. पुरस्कारांनी प्रोत्साहन मिळते. मात्र, मैफिलीत मिळणारी श्रोत्यांची दाद हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. माझे गुरू, माझे आई-वडील यांचा आशीर्वाद आहे. गायिका व्हायचे ठरवलेले नव्हते. त्यामुळे हा प्रवास किती कठीण आहे हे माहीत नव्हते. माझ्या गुरूंनी मार्ग दाखवला. पुढे माझी वाट मलाच शोधावी लागली. माझ्या गुरूंनी मला फुलू दिले, मला मोकळेपणाने शिकू दिले. रसिकांचे मिळालेले प्रेम, पुरस्कार यामुळे मी काहीतरी चांगले केले असावे.

डॉ. प्रभा अत्रे, पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त

देशाच्या जडणघडणीत अनन्यसाधारण योगदान देणाऱ्या दिग्गजांच्या बरोबर पद्म किताबाचा मानकरी ठरणे हा माझा बहुमान आहे. भारत सरकारला मी मन:पूर्वक धन्यवाद देतो. आरोग्य हा समाजाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. सर्वाना समान आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन.

डॉ. सायरस पूनावाला, व्यवस्थापकीय संचालक, सीरम इन्स्टिटय़ूट

चाळीस वर्षांपासूनच्या संशोधनाची पद्मश्री ही पावती आहे. विंचूदंश आणि सर्पदंशावर उपचारांसाठी रुग्णांनी विश्वास दाखवल्यामुळेच मी दीर्घकाळ काम करू शकलो. महाडमध्ये मी काम करतो. येथील नागरिक आणि रुग्ण यांना या सन्मानाचे श्रेय देतो. येत्या काळात बी-१२ जीवनसत्त्वाची कमतरता आणि करोना अशा विषयांवरील संशोधन पूर्ण करायचे आहे. त्यासाठी हा किताब उत्साह वाढवणारा ठरेल.

डॉ. हिंमतराव बावस्कर

पद्मविभूषण

प्रभा अत्रे ज्येष्ठ शास्त्रीय गायिका

पद्मभूषण नटराजन चंद्रशेखरन :  ‘टाटा’ सन्सचे अध्यक्ष

सायरस पुनावाला : ‘पूनावाला उद्योग समूहा’चे अध्यक्ष

पद्मश्री

डॉ. हिंम्मतराव बावस्कर :

विंचू दंशावरील संशोधन

सुलोचना चव्हाण : लावणीसम्राज्ञी

सोनू निगम : पार्श्वगायक

अनिल राजवन्सी : निंबकर अ‍ॅग्रीकल्चर रिसर्च इन्सिटय़ूटचे संचालक, फलटण

डॉ. विजयकुमार डोंगरे : वैद्यकीय सेवा

डॉ. भिमसेन सिंघल : वैद्यकीय सेवा

डॉ. बालाजी तांबे (मरणोत्तर) : आयुर्वेद

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ten people from maharashtra get padma awards zws

Next Story
राज्यातील ५१ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदके जाहीर ; चौघांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा’, तर सात जणांना पोलीस शौर्य पदक
फोटो गॅलरी