पत्नीचा छळ केल्याबद्दल पतीला १० वर्षे शिक्षा

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच लैंगिक अत्याचारही केले आणि गळा दाबून खुनाचाही प्रयत्न केल्याबद्दल विकृत मनोवृत्तीच्या पतीला सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच लैंगिक अत्याचारही केले आणि गळा दाबून खुनाचाही प्रयत्न केल्याबद्दल विकृत मनोवृत्तीच्या पतीला सोलापूरच्या  सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात मुलाची साक्ष महत्त्वाची ठरली.
राजेश रवींद्र दुधगी (४०, रा. राजीवनगर,) असे आरोपीचे नाव आहे. राजेश याचा विवाह मंजुश्री (३४) हिच्याबरोबर २००१ साली झाला होता. परंतु सुरुवातीला काही दिवस चांगले नांदविल्यानंतर पती राजेश याने मंजुश्रीचा छळ सुरू केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन राजेशकडून तिला मारझोड होत असे. दरम्यानच्या काळात त्यांना दोन मुले झाली. पतीकडून होणारा छळ निमूटपणे सहन करीत मंजुश्री ही संसाराचा गाडा कसाबसा ढकलत असताना काहीही कामधंदा न करणारा राजेश हा मंजुश्री हिला माहेरातून एक तोळे सोने आणण्यासाठी पुन्हा छळ करू लागला. एवढेच नव्हे तर विकृत मनोवृत्तीने तो तिचा लैंगिक छळही करीत असे. पत्नीवर लैंगिक छळ करीत असतानाच त्याची नजर स्वत:च्या बहिणीवर पडली होती. त्यामुळे आई व बहीण या दोघींनी राजेशपासून विभक्त होऊन नातेवाईकांकडे राहणे पसंत केले.
दरम्यान, राजेश याने १८ जानेवारी २०१३ रोजी मंजुश्री हिच्याबरोबर भांडण काढून तिचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न केला. तेव्हा मुलांनी आरडाओरडा केल्यामुळे शेजारच्या मंडळींनी हस्तक्षेप केला. याप्रकरणी मंजुश्री हिने अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. मराठे यांच्यासमोर झाली. सरकारतर्फे नऊ साक्षीदार तपासले गेले. यात मुलगा श्रीनिवास याने पित्याच्या क्रौर्याची कहाणी न्यायालयासमोर कथन केली. सरकारतर्फे अ‍ॅड. माधुरी देशपांडे यांनी बाजू मांडली. मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. आर. बी. रोट्टे तर आरोपीतर्फे अ‍ॅड. अरविंद अंदोरे यांनी काम पाहिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ten years pump to husband in issue of wifes torture