scorecardresearch

सांगली : मिरजेत पाडकाम झालेल्या गाळेधारकांना नोटीस दिल्याने तणाव

ज्या गाळेधारकांची दुकाने उध्वस्त झाली त्यांनाच नोटीसा देउन गप्प बसविण्याचा प्रकार प्रशासनाच्या माध्यमातून पडळकर करीत असल्याचा आरोप सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी केला.

सांगली : मिरजेत पाडकाम झालेल्या गाळेधारकांना नोटीस दिल्याने तणाव
मिरजेत पाडकाम झालेल्या गाळेधारकांना नोटीस दिल्याने तणाव

मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील पाडकाम करण्यात आलेल्या जागेवर गाळेधारकांना आहे तीच स्थिती कायम ठेवण्याची नोटीस तालुका दंडाधिकार्‍यांनी बजावल्याने रविवारी या परिसरात पुन्हा तणाव निर्माण झाला होता. याबाबत दोन्ही बाजूंना कागदपत्रासह सोमवारी हजर राहण्याची सूचना या नोटीसमध्ये तालुका दंडाधिकार्‍यांनी दिली आहे.

हेही वाचा- “सगळे घाव झेलायला ताई आणि मलाई खायला…”, पंकजा मुंडेंबाबत प्रीतम मुंडेंचं मोठं विधान!

शनिवारी मध्यरात्री आ. गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांनी जमावाने लाठ्या, काठ्या, लोखंडी सळई या हत्यारासह येउन चार पोकलॅण्ड यंंत्राच्या मदतीने मिरजेतील शिवाजी रोडवर असलेले दुकाने गाळे आतील साहित्यासह मातीत मिसळले. या घटनेनंतर आज सकाळी काही दुकानधारकांनी दुकानातील विखुरलेले साहित्य एकत्र करून अर्धवट स्थितीतील दुकान गाळे पत्रे मारून बंदिस्त करण्याचा प्रयत्न चालविला होता. यावेळी तालुका दंडाधिकार्‍यांनी नियम १४५ अन्वये नोटीस बजावली असून वादग्रस्त ठिकाणी आहे ती स्थिती कायम ठेवण्याची सूचना दोन्ही बाजूंना करण्यात आली आहे. पोलीसांनी हा प्रकार दिवाणी स्वरूपाचा असला तरी वादातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होउ शकतो असा अहवाल तालुका दंडाधिकार्‍यांना दिला होता. यावर ही नोटीस १७जणांना बजावण्यात आली.

हेही वाचा- शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच गाडीतून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण

दरम्यान, हा प्रकारच अनाकलनीय असून ज्या गाळेधारकांची दुकाने उध्वस्त झाली त्यांनाच नोटीसा देउन गप्प बसविण्याचा प्रकार प्रशासनाच्या माध्यमातून पडळकर करीत असल्याचा आरोप सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी केला. या नोटीसामुळे घटनास्थळी प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली होती. उप अधिक्षक पद्या कदम, शहर ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे, ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख, महात्मा गांधी चौक ठाण्याचे सहायक निरीक्षक रविराज फडणीस आदींसह सुमारे दोनशे पोलीस कर्मचारी तैनात होते.

हेही वाचा- “मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची निवडही जनतेतून व्हावी”, अजित पवारांची मोठी मागणी, म्हणाले, “ज्यावेळी…”

दरम्यान, अन्यायग्रस्त गाळेधारकांना नोटीस बजावणी करून चोर सोडून संन्यासालाचा फासावर लटकविण्याचा प्रकार असल्याचा आरोप एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांनी केला. तर या पाडकामाची स्वतंत्र चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात येत असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब वनमोरे यांनी सांगितले. यावेळी महापालिकेतील राष्ट्रवादीचे गट नेते मैनुद्दीन बागवान, नगरसेवक अतहर नायकवडी, माजी महापौर इद्रिस नायकवडी, विवेक कांबळे आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-01-2023 at 18:17 IST

संबंधित बातम्या