तेर हे अलिकडेचे नाव. तगर हे जुने नाव. याच तगरमध्ये २१ पुरातन गणेशमूर्ती आजही आहेत. गणेशाची काही नाणीही आहेत. रामलिंगअप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालयातील हा ठेवा आजही गणेशाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व सांगणारे आहे.

हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांच्या सहअस्तित्वातून समृद्ध झालेल्या तेरनगरीच्या प्राचीन वैभवाची साक्ष आजही येथील पुरातन वास्तू, शिल्पे आणि उत्खननातून मिळालेल्या अवशेषांमधून मिळते. यातील प्राचीन गणेशशिल्पे एका गावात सुस्थितीत आढळणे हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे.

तेर येथील उत्खननात विविध प्रकारच्या दगडांमध्ये साकारलेल्या गणेशमूर्ती तसेच गणेशाचे अंकन असलेली नाणी आढळली आहेत. यातील अनेक पुरातन मूर्ती रामलिंगआप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयात जतन करण्यात आल्या आहेत. आकाराने लहान असल्या तरी त्यांच्या बारकाईने केलेल्या कलाकुसरीतून तत्कालीन शिल्पकारांची कल्पकता, कलादृष्टी आणि गणेशभक्ती प्रकर्षाने जाणवते.

संग्रहालयात मयुरावर आरूढ गणेशमूर्ती, उत्तर यादवकालीन मानली जाणारी अलंकारांनी नटलेली गणेशमूर्ती आणि शहाबादी दगडात कोरलेली, सोंड मोदकाला स्पर्श करताना दर्शविणारी मूर्ती विशेष आकर्षण ठरतात. तेरमधील मेंडेश्वर, तुंगेश्वर, कणकेश्वर महादेव, नरसिंह, अंबिका, चामुंडा, सिद्धेश्वर आणि कालेश्वर मंदिरांमध्येही विविध कालखंडातील गणेशशिल्पे पाहायला मिळतात. हा वारसा केवळ श्रद्धा आणि अध्यात्माचा विषय तर आहेच पण यापेक्षाही अधिक तेरच्या प्राचीन इतिहास, शिल्पकला आणि सांस्कृतिक परंपरेचा तो जिवंत दस्तऐवज आहे. जगभरातील पर्यटक, इतिहास अभ्यासक आणि शिल्पशास्त्राच्या तज्ज्ञांसाठी तेरचा हा गणेशमूर्तीचा वारसा महत्त्वपूर्ण आहे.