अलिबाग : मुरुडचा काशिद समुद्र किनारा हा एरवी पर्यटकांनी कायम गजबजलेला असतो आज मात्र या समुद्र किनाऱ्यावर भयाण शांतता आहे. किनाऱ्यावर शेकडो सुरुची वृक्षे उन्मळून पडली आहेत. किनाऱ्यावर पर्यटकच काय? पण स्थानिकही फिरकणार नाही’. अशी गत निसर्ग वादळाने केली आहे.

मुरुड तालुक्यातील काशिद हे कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या गावाला आवर्जून भेट देत असतात. रुपेरी वाळू, विस्तीर्ण समुद्र किनारा, सुरुच्या बागा, समुद्र किनाऱ्यावर निवांत वेळ घालवता यावा यासाठी स्थानिक दुकानदारांकडून व्यवस्था केलेली असते. त्यामुळे या समुद्राचे एक विलक्षण अप्रुप इथे येणाऱ्या पर्यटकांना असते, आज मात्र हा किनारा भकास झाल्यासारखा वाटतो. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा याला कारणीभूत ठरला आहे.

Stormy rains damage mango orchards in Trimbakeshwar taluka
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वादळी पावसामुळे आंबा बागांचे नुकसान
buldhana bull died due to thunderstorm
बुलढाणा: खामगाव तालुक्याला ‘अवकाळी’ तडाखा; वीज कोसळून बैल ठार, शाळा-घरांवरील टीनपत्रे उडाली
dombivli marathi news, pedestrian bridge on railway line
डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळील रेल्वे मार्गावरील पादचारी पूल धोकादायक; १ एप्रिलपासून डोंबिवली पूर्व-पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग बंद
Mild earthquake tremors in Akola district
अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे

वादळामुळे किनाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. किनाऱ्यावरील सुरुची शेकडो वृक्षे उन्मळून पडली आहेत. पर्यटकांना विसावा घेण्यासाठी किनाऱ्यावर स्थानिकांनी उभारलेला निवारा, शेड वादळाने उखडून टाकल्या आहेत.

स्थानिकांची ४७ दुकाने, स्वच्छतागृहे यांचेही नुकसान झाले आहे. झाडय़ांच्या फांद्या, पालापाचोळा सर्वत्र अस्ताव्यस्त पसरलेला आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर जाणेही अवघड झाले आहे. गावातील परिस्थिती फारशी वेगळी नाही. गावातील निवास न्याहरी केंद्र, हॉटेल्स आणि लॉजेसला वादळाचा फटका बसला आहे. लहान मोठय़ा इमारतीवरील पत्रे उडून गेली आहेत. घरांचीही पडझड झाली आहे. निसर्ग संपन्न किनाऱ्यावर आज अवकळा पसरल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळते आहे.

 

आधी करोनामुळे आणि आता निसर्गाच्या प्रकोपामुळे येथील पर्यटन व्यवसायाचे कंबरडेच मोडले आहे. ऐन हंगामात लागू झालेल्या टाळेबंदीत जिल्ह्यातील पर्यटनाचा उन्हाळी हंगाम कोरडा गेला होता. जेव्हा निर्बंध शिथिल झाले. तेव्हा नेमके निसर्ग चक्रीवादळ रायगडच्या किनाऱ्यावर धडकले. यामुळे पर्यटन व्यवसायावर दुसरे मोठे संकट ओढावले. निसर्गानेच येथील निसर्गाचा बळी घेतला. यातून सावरण्यासाठी काशिदकरांना बराच कालावधी लागणार आहे.

‘ शासनाने जाहीर केलेल्या मदतीने पर्यटन व्यवसायिक आणि छोटय़ा दुकानदारांचा विचार करण्यात आलेला  नाही. टाळेबंदीमुळे दोन महिने आमचे व्यवसाय बंद होते, आता वादळाने दुकान आणि त्यातील सामानांचे नुकसान केले आहे. या दुहेरी संकटाने येथील पर्यटन व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे.’ 

  – शरद बेलोसे, स्थानिक  

‘वादळ येऊन १० दिवस झाले आमच्याकडे साधे पंचनामे करायला कोणी आले नाही. अनेकांनी कर्ज काढून आपले व्यवसाय सुरु केले होते. आज त्या कर्जाची परतफेड करणेही शक्य होणार नाही. शासनाने पर्यटन व्यवसायिकांनाही मदत केली पाहिजे.’

-रमण खोपकर, स्थानिक व्यावसायिक