|| प्रल्हाद बोरसे
गुणधर्मामुळे जागतिक स्तरावर मागणी
मालेगाव : भारी पोषकमूल्य आणि औषधी उपयुक्ततेसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘एवोकॅडो’ या परदेशी फळपीकाची लागवड करण्याच्या दृष्टीने राज्याच्या कृषी विभागातर्फे चाचणी सुरू झाली आहे. हे फळपीक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या  चांगले फायदेशीर ठरू शकते, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे यांनी दिला होता. त्यांच्याच सूचनेनुसार कृषी विभागाने ही चाचणी हाती घेतली असून ती सकारात्मक आढळून आल्यास शासनाच्या फलोत्पादन कार्यक्रमांतर्गत राज्यात व्यापक प्रमाणात या फळपीकाची लागवड करण्याचा कृषी विभागाचा मानस आहे.

मुबलक प्रमाणातील प्रथिने आणि जीवनसत्त्वे या गुणधर्मामुळे ‘एवोकॅडो’ या फळाला जागतिक स्तरावर चांगली मागणी आहे. रक्तदाब आणि साखर नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरत असल्याने मधुमेही आणि हृदयरोग रुग्णांसाठीदेखील हे फळ लाभदायी असल्याचे मानले जाते. लोण्यासारखी चव असल्याने ‘बटर फ्रुट’ असे त्याला म्हटले जाते. मूळचे मेक्सिको या देशातील हे फळ आहे. नंतरच्या काळात स्पेन, उत्तर व दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका अशा काही देशांमध्ये त्याची शेती सुरू झाली. अलीकडे भारतात दक्षिणेकडील केरळ, तमिळनाडू या राज्यांमधील निवडक शेतकरी या फळ पिकाची शेती करू लागले आहेत.

maharashtra top in gst collection
जीएसटी संकलनात महाराष्ट्र अव्वल! सरलेल्या आर्थिक वर्षात तिजोरीत ३.२ लाख कोटींची भर
Maharashtras E-crop Inspection project has attracted the Central Government
महाराष्ट्राच्या ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाची केंद्राला भुरळ
Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
mhada lottery pune , mhada pune marathi news
खुषखबर… म्हाडा लॉटरीला मुदतवाढ, १०० घरेही वाढली

महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन वर्षांत नाशिक, पुणे भागांतील काही शेतकऱ्यांनीही प्रायोगिक तत्त्वावर या फळपिकाची लागवड केलेली आहे.

या फळपिकाच्या वेगवेगळ्या जाती असून कलम पद्धतीने किंवा बियाणे खोपून त्याची लागवड केली जाते. कलमी रोपाची लागवड केलेल्या झाडाची उंची साधारणत: २५ फुटापर्यंत वाढते आणि तीन वर्षांनंतर उत्पन्न सुरू होते. तर बी खोपून लागवड केलेल्या झाडाची उंची ५० फुटापर्यंत वाढते आणि पाच ते सात वर्षांनंतर उत्पन्न सुरू होते. अर्थात प्रत्यक्ष उत्पन्न सुरू होण्यापूर्वी सुरुवातीची काही वर्षे या झाडांमध्ये आंतरपीकदेखील घेता येते.

तसेच एकदा लागवड केलेल्या या झाडापासून २५ ते ५० वर्षे अशा मोठ्या काळापर्यंत उत्पन्नाची हमी असते. आजच्या घडीला देशात प्रामुख्याने आयात केलेल्या ‘एवोकॅडो’ फळांची विक्री होत असून काही प्रमाणात भारतात उत्पादित फळेही उपलब्ध होत आहेत. त्याला प्रति किलो १०० ते ५०० रुपये किलो, असा दर मिळत आहे.

किमान १५ ते कमाल ४० अंश सेल्सियस तापमान या फळपीकास अनुकूल असते. त्यामुळे कोकणासह राज्यातील बहुतांश भागात या फळपिकाची शेती केली जाऊ  शकते. तसेच वाढती मागणी आणि चढ्या दरामुळे या फळापासून चांगले उत्पन्न मिळून ही शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते, असाही अंदाज आहे. त्याचमुळे राज्यात या फळपिकाची लागवड होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने कंबर कसली आहे.

त्या अनुषंगाने दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठामार्फत या फळपिकाची २०० रोपे दक्षिण अफ्रिकेतून मागविण्यात आली आहेत. विद्यापीठातर्फे लवकरच या रोपांची लागवड करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या चाचणीत सकारात्मक चित्र दिसल्यानंतर या लागवडीसाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणार आहे.

शेतकरी सुखी व समृद्ध व्हावा, असा ध्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे. त्या अनुषंगाने शेतीतील उत्पन्नवाढीसाठी राज्य शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रगतशील शेतकरी अशा विविध घटकांचा सल्ला व सूचनांचा स्वीकार त्यासाठी केला जात आहे. राज्यात ‘एवोकॅडो’ या परदेशी फळपिकाची लागवड करण्यासंदर्भात अशीच एक सूचना तेजस ठाकरे यांच्याकडून आली होती. त्यावर कृषी विभागाकडून काम सुरूकरण्यात आले आहे. अपेक्षेप्रमाणे या फळपिकाच्या चाचणीत चांगले निष्कर्ष आढळून आल्यास चांगले उत्पन्न देणाऱ्या नव्या पिकाचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असून ही बाब फळबाग क्षेत्रातील मैलाचा दगड ठरू शकते. – दादा भुसे (कृषिमंत्री)