TET Exam Mangalsutra Sambhaji Nagar : आज राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा होत आहे. यानिमित्ताने राज्यभरातील हजारो उमेदवार परीक्षा केंद्रावर पोहोचले. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये काही महिला उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागला. परीक्षा केंद्रातील नियम म्हणून त्यांना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि इतर दागिने काढून ठेवण्यास सांगितले. यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी याविरोधात आवाज उठवला असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारी दडपशाही

शिक्षक पात्रता परिक्षेसाठी गेलेल्या महिला उमेदवारांच्या गळ्यातील मंगळसूत्रासहित सर्व दागिने काढून ठेवण्यास सांगण्यात आले. यावरून अंबादास दानवे म्हणाले, “विचित्र विरोधाभास! ‘हिंदुत्व’ आणि ‘संस्कृती’च्या गप्पा मारणाऱ्यांच्या राज्यात महिलांना मंगळसूत्र काढून परीक्षेला बसावं लागतंय. ११ वर्षांच्या सत्तेनंतरही प्रशासनाला ‘मंगळसूत्र’ आणि ‘कॉपी’ मधला फरक कळत नाही बहुदा. ही आपली संस्कृती की सरकारी दडपशाही? ही परीक्षा हिंदुस्थानात सुरु आहे, पाकिस्तानात नाही.” असा संताप अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.

चौकशीचे आदेश दिले जातील

याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही विचारण्यात आलं. ते म्हणाले, “यासंदर्भात मागच्या काळातही तक्रारी आल्या होत्या. यासंदर्भात मी माहिती घेईन. मागच्या वेळी असा विषय झाला होता तेव्हा परीक्षेचं आयोजन करणाऱ्यांनी सांगितलं होतं की असे अनुभव आले की वेगवगेळ्या गोष्टींमध्ये साहित्य लपवले जाते. त्यातून चिटींग केली जाते. तथापी अशा पद्धतीने मंगळसूत्र काढून घेणं योग्य नाही. परंतु, याची आधी काळजी घेणं गरजेचं आहे. याबाबत सूचना दिल्या जातील आणि याची चौकशी केली जाईल.”

परीक्षा केंद्रातील नियम काय सांगतो?

दरम्यान, परीक्षेवेळी परीक्षा केंद्रांवर मेटल डिटेक्टरने तपासणी केली जाते. यामध्ये धातूची दागिने, उदा. मंगळसूत्र, चेन, कानातले, अंगठ्या अशी आभूषणे काढून ठेवण्यास सांगितले जातात. परंतु, या नियमाची माहिती नसल्याने परीक्षा केंद्रांवर गेल्यावर सोन्याचे दागिने कुठे काढून ठेवायचे हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे परीक्षा केंद्रावर जाताना कधीच किमती वस्तू किंवा दागिने परिधान करून जाऊ नये, असं आवाहन केलं जातं.