केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारावरून राजकीय वर्तुळात सध्या मोठा वाद पेटला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काही निर्णय मनमानीपणे घेतल्याची बातमी समोर आली आणि त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. त्यामुळे ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्यावतीने ६ ऑक्टोबर रोजी सर्व विरोधी पक्षाचे नेते आणि खासदार निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार आहेत. तसेच दुसरीकडे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या विरोधात मुंबईत ठाकरे बंधूंनीही एल्गार पुकारला आहे. येत्या ४ ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
ठाकरे बंधूंच्या या मोर्चाला ‘गर्जना’ मोर्चा असं नाव देण्यात आलं आहे. दरम्यान, या गर्जना मोर्चाबाबत राज ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर करत महत्वाची माहिती सांगितली आहे. ठाकरे बंधूंच्या या ‘गर्जना’ मोर्चाच्या मार्गात एक मोठा बदल करण्यात आला आहे.
ठाकरे बंधूंचा मोर्चा कुठून निघणार?
निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची मोठी तयारी करण्यात आली असून या मोर्चात सर्व विरोधी राजकीय पक्षांना सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईत ठाकरे बंधूंचा हा गर्जना मोर्चा मेट्रो सिनेमा ते बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय असा निघणार आहे. या बदललेल्या मार्गाची सर्वांनी नोंद घ्यावी, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.
राज ठाकरे यांनी काय म्हटलं?
“निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचा ‘गर्जना’ मोर्चा येत्या ४ ऑक्टोबर २०२६ ला निघणार आहे. याबाबत तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. पण मोर्च्याचा आधीचा मार्ग बदलावा अशी विनंती मुंबई पोलिसांनी केली होती. त्या विनंतीला मान देऊन हा मोर्चा ‘मेट्रो सिनेमा’ ते ‘बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय’ असा निघणार आहे. या बदललेल्या मार्गाची महाराष्ट्र सैनिकांनी, शिवसैनिकांनी आणि मोर्च्यात सामील होणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. बाकी मोर्च्याला भेटूच”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
