ठाण्याच्या मानपाडा येथील मनोरमा नगर परिसरात मंगळवारी रात्री ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पाच जणांनी चार राऊंड फायरिंग करत पुर्णेकर यांचा जीव घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात देखील घेतलं आहे. यानंतर आता प्रदीप पुर्णेकर यांच्या मुलाने माझ्या वडिलांना ठार मारण्याआधी रेकी करण्यात आली होती असा आरोप केला आहे.
काय म्हटलंय राम पुर्णेकर यांनी?
“माझ्या वडिलांचा मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मी कुणाबद्दल कधी बोललो नाही. माझ्या वडिलांनी कधीही मला समोर आणलं नव्हतं. जे चार आरोपी आहेत ते माजी महापौरांच्या नवऱ्यासह उभे होते हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. दोन आरोपी माझ्या कारमध्ये येऊन कारही बघून गेले. माझ्या वडिलांची हत्या करण्यापूर्वी रेकी करण्यात आली होती. माझ्यासह आणखी दोन जणांनी हे पाहिलं होतं. माझ्या वडिलांना आधी धमकी दिली गेली होती. त्यांना संशय होता की काहीतरी घडेल. जे आरोपी आहेत त्यांनी रेकी करण्यात आली होती. माझ्या वडिलांना सगळे बाळूदादा म्हणायचे. मात्र आरोपी मला येऊन एकदा म्हणाला होता की प्रदीपदादा. मला त्याचं नाव माहीत नाही. पण त्याला मी गणपतीत आमच्या परिसरात पत्ते खेळत होता. माझ्या वडिलांच्या मानेवर वार करण्यात आले. तसंच गोळ्याही झाडून त्यांना ठार करण्यात आलं. हे का घडलं आहे ते मलाही नीट सांगता येणार नाही. लोकांसाठी माझ्या वडिलांनी खूप गोष्टी केल्या होत्या. कदाचित यामागे ड्रग माफियाही असू शकतात किंवा राजकीय वादातूनही हे घडलेलं असू शकतं. “
कोण होते प्रदीप पूर्णेकर?
ठाण्यातील मानपाडा, आझादनगर, मनोरमानगर भागाचं प्रतिनिधीत्व प्रदीप पूर्णेकर हे ठाकरे गटाकडून करत होते. प्रदीप पुर्णेकर हे या तीन विभागांचे विभाग प्रमुख होते. ते आगरी समजाचे असून त्यांचे चुलत बंधू दिवंगत बाळकृष्ण पूर्णेकर हे काँग्रेसचे मोठे नेते होते. परंतु काही वर्षांपूर्वी त्यांचे अपघाती निधन झाले. तर माजी नगरसेवक जयनाथ पूर्णकर हे त्यांचे सख्खे भाऊ आहेत. जयनाथ पूर्णेकर हे अनेक वर्षे मानपाडा प्रभागातून निवडून येत होते. जयनाथ पूर्णेकर निवडून येण्यामध्ये प्रदीप पूर्णेकर यांचा मोठा सहभाग होता. मूळचे काँग्रेस पक्षाची विचारधारा असलेले पूर्णेकर बंधू हे शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे यांच्या पक्षात आले. त्यानंतर त्यांनी शेवट पर्यंत ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे.
