भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकारपरिषदेत बोलताना मराठा आरक्षणाच्या मुद्य्यावरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. “मराठा समजाने भूमिका घ्यावी, ५८ मोर्चे तुम्ही काढले असतील तर ५९ वा मोर्चा तुम्ही काढण्याची वेळ आलेली आहे. एवढं आवाहन मी मराठा समाजाचा तरूण, तरूणींना आणि समजाला करतो. आज जर आपण आवाज उचलला नाही. तर आपलं भविष्य निश्चितच अंधारामध्ये येईल.” असं नितेश राणे म्हणाले आहेत. तसेच, “यांना आर्यन खानची किती चिंता आहे ना, पण पाटलाच्या मुलाची चिंता नाही. देशमुखाच्या मुलीची चिंता नाही. पण खानच्या मुलाची चांगली चिंता आहे.” असंही नितेश राणेंनी यावेळी बोलून दाखवलं आहे.

पत्रकारपरिषदेत बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, “मी आवर्जून मराठा समाजाला सांगतो हे दोन वर्ष तुम्ही नजरेसमोर ठेवले पाहिजे. ५८ मोर्चा काढणारे आमच्या मराठा समाजाचे बांधव. यांनी तो काळ परत इथे आणला पाहिजे असं माझं त्यांना आवाहन आहे. या सरकारला जर तुम्ही झुकवलं नाही तर हे गेंड्याच्या कातडीचे लोक आहेत.”

तसेच, “अरबी सुमद्रात शिवाजी महाराजांचं मोठं स्मारक उभारलं जात आहे, या दोन वर्षात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी त्या स्मारकारबद्दल किती बैठका घेतल्या हे जरा मराठा समजाच्या लोकांना त्यांनी सांगावं. किती बैठका घेतल्या? घेतल्या असतील तर फोटो तरी दाखवा. घरी बसून बैठका घेतल्या असतील तर त्याचे मिनिट्स तरी दाखवा. म्हणजे एकाबाजूला तुम्हाला स्मारकारचं काम करायचं नाही.” असंही नितेश राणे म्हणाले.

सारथी, अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळ या संस्थांचा कणा मोडणारे ठाकरे सरकार –

याचबरोबर, “मराठा समजासाठी सारथी नावाची संस्था जी होती, जी आमच्या देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समजातील लोकांना ताकद मिळण्यासाठी उभी केली, चालवली आणि सक्षम करण्यासाठी सुरू केली. त्या सारथीची काय अवस्था करून ठेवली आहे? सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ असो सगळ्या बाजुंनी मराठा समाजाचा कणा मोडण्याचं काम या राज्य सरकाराने केलेले आहे. राज्य सरकारने आमचे हे राजकीय आरोप समजू नये. पण मी त्यांना आव्हान करतो तुमच्यात हिंमत असेल, तर आमच्या मराठा समजामध्ये एका मंत्र्याला पाठवा आणि त्यांच्यासमोर त्यांना बाजू मांडू दे की दोन वर्षात आरक्षणाबद्दल सरकारने नेमकं काय केलेलं आहे. आज देखील आयोग स्थापन झालेला नाही, सर्वे होत नाही. मराठा समजाताली तरूणांचं वय दिवसेंदिवस वाढत आहे, तरी देखील नोकरीबद्दल कुठल्याही पद्धतीची शाश्वती राज्य सरकार त्यांना देऊ शकत नाही. म्हणून या सगळ्या बाबतीत राज्य सरकारने आमच्या मराठा समाजाला उत्तर दिलंच पाहिजे.” असं यावेळी नितेश राणे यांनी सांगितले.