Thackeray group attacks Bachchu Kadu : प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. त्यांना विधान परिषदेचेही उमेदवारी मिळाली आहे. बच्चू कडू यांनी त्यांचा प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन केल्याने त्यांच्यावर राजकीय टीकाही होऊ लागली आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून बच्चू कडूंच्या या निर्णयावर टीका करण्यात आली असून एकनाथ शिंदेंनाही यात लक्ष्य करण्यात आलं आहे.

बच्चू कडूंनी जिवंत समाधी घेतली

बच्चू कडू महाविकास आघाडीत मंत्री होते. मात्र एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर ते त्यांच्याबरोबर गेले. मात्र, मधल्या काळात त्यांनी केंद्र सरकारवर सातत्याने टीका-टिप्पणी सुरू ठेवली होती. त्यामुळे आपण शिंदे गटात जाणार नसल्याचं त्यांनी दोनच दिवसांपूर्वी सांगितलं होतं, त्यावर सामनातून आता टीका करण्यात आली आहे. अग्रलेखात म्हटलंय, “अमरावती विभागात बराच काळ आमदार व मंत्री असलेले श्रीमान बच्चू कडू यांनी स्वतःला मिंधे गटात विलीन करून जिवंत समाधी घेतली. या समाधी सोहळ्यास स्वतः उपमुख्यमंत्री मिंधे व कडू यांचे अनुयायी हजर होते. कडू यांचा हा समाधी व समर्पणाचा सोहळा आटपल्यावर त्यांचा राजकीय वैकुंठाचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी त्यांचे नवे गुरू महाराज मिंधे यांनी कडू महाराजांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्यामुळे समाधी अवस्थेत कडू यांना देव दिसला.”

बच्चू कडूंचं खरं रुप दिसलं

“कडू हे विधानसभा निवडणूक हरले तेव्हापासून ते पाण्याबाहेर पडलेल्या माशाप्रमाणे तडफडताना दिसत होते. एका सामाजिक कार्यकर्त्याची ही तडफड समाजाला अस्वस्थ करणारी आहे. कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोर्चे काढले, आंदोलने केली. दिव्यांगांच्या, वंचितांच्या प्रश्नांवर सतत आवाज उठवला. त्यांच्या प्रहार संघटनेचे कार्यकर्ते महाराष्ट्रात काम करीत होते. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते, पण मिंधे गट फुटला व सरकार पडले तेव्हा हा ‘सेवाभावी’ कार्यकर्ता सुरत, गुवाहाटी, गोवा अशी तीर्थयात्रा करून महाराष्ट्रात परतला व गंगेत डुबकी मारून आल्याचा आनंद घेत सरकारदरबारी फिरत राहिला. त्यामुळे लोकांना त्यांचे खरे रूप दिसले”, अशी टीकाही सामनातून करण्यात आली.

“कोविड काळानंतर सत्ताबदलाची चाहूल लागताच अपंग, शेतमजुरांच्या कल्याणासाठी त्यांनी मिंध्यांची भलामण सुरू केली. ही भलामण करूनही मंत्रीपद मिळाले नाही तेव्हा पुन्हा सरकारवर टीका सुरू केली. उपोषणे, आंदोलने सुरू केली. कडू महाराज २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत हरले. त्यांची आमदारकीची वस्त्रे जनतेने उतरवली तेव्हापासून त्यांची तडफड सुरू होती. आता या तडफडणाऱ्या आत्म्याने शरीरावर नवीन वस्त्रे परिधान करून मिंधे पक्षात प्रवेश केला व पुन्हा ‘आमदार’ म्हणून प्राणज्योतीचा दिवा पेटवला”, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

लाचारीची ही कोणती पायरी?

“‘आमदारकी’साठी कडू महाराजांनी घेतलेली ही समाधी म्हणजे समाजकारणाच्या नावाखाली सुरू असलेल्या ढोंगाचा पर्दाफाश आहे. यापुढे कडू महाराज हे मिंध्यांची ताकद वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहेत. मात्र त्याआधी त्यांचे विधान होते की, ”आम्ही मिंध्यांसोबत आमदारकीसाठी जाणार नाही. आमदारकीसाठी मिंध्यांसोबत जाण्याएवढे आम्ही नालायक नाही.” कडू महाराजांनी हे दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते. आज त्याचा त्यांना विसर पडला आणि ते ‘मिंधेवासी’ झाले. अमरावतीत ‘बच्चू कडू विरुद्ध रवी राणा’ असा संघर्ष आहे. दोन ‘नौटंकी’मधला हा संघर्ष म्हणजे जनतेला मूर्ख बनविण्याचे धंदे आहेत. राणा यांना भाजपने उमेदवारी दिली तेव्हा ही ‘लाचारी’ असल्याची टीका कडू यांनी केली. मग आता कडू महाराजांनी जी समाधी घेतली ती लाचारीची कोणती पायरी समजायची?” असा प्रश्नही त्यांनी विचारला.