लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निकालात एनडीएला २९३ जागा मिळाल्या आहेत. तर इंडिया आघाडीला २३३ जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात महायुतीला १७ जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील जागांची संख्या घटली आहे. त्यामुळे महायुतीसह भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाच्या नेत्यांनी प्रचारादरम्यान ४५ प्लसचा नारा दिला होता. पण त्यांचं ४५ प्लसच त्यांचं स्वप्न भंगलं.
मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी एक विधान केलं होतं. “महाराष्ट्रात महाविकास आघाडीला १८ पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारणातून संन्यास घेईन”, असं शेलार म्हणाले होते. त्यांच्या या विधानावरून आता त्यांच्यावर विरोधक हल्लाबोल करत आहेत. ठाकरे गटाचे नेते अरविंद सांवत यांनी आशिष शेलार संन्यास कधी घेणार?, असं म्हणत टोला लगावला आहे.
अरविंद सांवत काय म्हणाले?
“देशात इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी वरिष्ठ नेते हालचाली करत आहेत. त्यांना आमची साथ असेल”. देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या विधानवर बोलताना सावंत म्हणाले, “त्यांनी जो राजकीय व्यभिचार मांडला. त्या राजकीय व्यभिचाराचा हा परिणाम आहे. आज त्यांना कळलं असेल की हे फार काळ चालत नाही. ते कधीतरी उघडकीस येतं आज त्याचे चटके त्यांना बसत आहेत. ४५ प्लस बोलले होते. आता ते दुसरे (आशिष शेलार) शांत आहेत, लपलेत कुठेतरी. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला १८ पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारणातून संन्यास घेईन असं ते म्हणाले होते. आता त्यांना विचारा की राजकारणातून ते कधी संन्यास घेणार?”, असा सवाल अरविंद सांवत यांनी केला आहे.
“जनता आशिष शेलारांच्या संन्यासाची वाट पाहत आहे. अहंकाराने डबडबलेली ही लोक आहेत. वैचारिक व्यभिचारी, सामाजिक व्यभिचारी आणि आर्थिक व्यभिचार केला, त्याचं प्रतिक देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्यावरही दोन व्यभिचारी आहेत. आमच्यांकडून जे गेले आणि त्यांना जे भेटले ते पण व्यभिचारी”, अशा शब्दांत अरविंद सावंत यांनी हल्लाबोल केला.
सुषमा अंधारेंचाही शेलारांना टोला
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्स या सोशल माध्यमावर पोस्ट शेअर करत करत आशिष शेलार यांनी केलेल्या विधानावरून टोला लगावला. त्यांनी म्हटलं, “आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करता, तेवढे सांगा, म्हणजे तुमच्या संन्यास सोहळ्याला मला तुम्हाला भगवी कफनी, रुद्राक्षाच्या माळा, काठी, लोटी, सगळं देता येईल”, अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी केली.