scorecardresearch

“देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या नेत्याने ‘या’ प्रकरणावरून दिला इशारा

“अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता, मग…”

Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray-3
देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे ( लोकसत्ता संग्रहित छायाचित्र )

अलीकडील काही दिवसांपासून अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी प्रकरणावरून राज्यात राजकीय गदारोळ सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अनिक्षा जयसिंघानीने १ कोटी लाचेची ऑफर दिली होती. याप्रकरणी अनिक्षा आणि बुकी माफिया अनिल जयसिंघानीवर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. यावर युवा सेना ( ठाकरे गट ) राज्य विस्तारक शरद कोळी यांनी भाष्य करत गृहमंत्र्यांकडून पोलीस यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला.

शरद कोळी म्हणाले, “महाविकास आघाडीत गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. तेव्हा त्यांनी राजीनामा देत, चौकशीला सामोरे गेले होते. देवेंद्र फडणवीस यांनीही चौकशीला सामोरं गेलं पाहिजे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी तातडीने राजीनामा द्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू,” असा इशारा शरद कोळींनी दिला आहे.

दरम्यान, अनिल जयसिंघानीने उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत २०१५ साली मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला होता, असा आरोप करण्यात येत आहे. याबद्दल विचारलं असता शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरेंनी सांगितलं, “हे सर्वांना माहिती आहे. ज्या जिल्ह्यातून जयसिंघानी येतो, तेव्हा जिल्हाप्रमुख कोण होते? पण मला यात जायचं नाही आहे. कारण, याच्यात सखोल चौकशी झाली पाहिजे. कोणाच्या घरात जाऊ शकतात, हे खूप गंभीर आहे.”

“..हे एकदा देवेंद्रभाऊंनी तपासून पाहावं”

शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारेंनी खासदार श्रीकांत शिंदे यांचं कार्यालय कोणाच्या जागेत आहे? हे तपासण्याची मागणी केली आहे. “उल्हासनगरच्या गोल मैदानात माझा भाचा श्रीकांत शिंदे याचं संपर्क कार्यालय कुणाच्या जागेत आहे हे एकदा देवेंद्रभाऊंनी तपासून पाहावं. श्रीकांत शिंदेचं संपर्क कार्यालय अनिल जयसिंघानीच्या जागेत आहे का? असेल तर कसं?” असा प्रश्न सुषमा अंधारेंनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 22:52 IST

संबंधित बातम्या