मागच्याच आठवड्यात संजय राऊत यांनी शिंदे गटाचा उल्लेख भाजपाने पाळलेल्या कोंबड्यांचा खुराडा असा केला होता. या कोंबड्यांच्या मानेवर कधीही सुरी फिरू शकते अशी खोचक टीकाही त्यांनी केली होती. त्यानंतर आता गजानन किर्तीकर यांनी जी नाराजी भाजपाबाबत बोलून दाखवली त्याचा संदर्भ घेत सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा टीका करण्यात आली आहे. या अग्रलेखातही चाळीस कोंबड्या आणि १३ तुर्रेबाज कोंबडे भाजपाच्या खुराड्यात बंदीवान आहेत असा उल्लेख करण्यात आला आहे.
काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?
शिवसेनेतून फुटलेल्या मिंधे गटाची अवस्था धोब्याच्या कुत्र्यासारखी झालेली दिसते आहे. जो येतो तो या कुत्र्याच्या पेकाटात लाथ मारीत आहे. आम्हीच शिवसेना असा विकतचा दावा करणाऱ्या गटाचे ज्येष्ठ पुढारी गजानन कीर्तिकर यांनी भाजपा देत असलेल्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. भाजपावाले आमच्या नीट वागत नाहीत, आम्ही त्यांचे सावत्र असल्याप्रमाणे वागतात. एनडीएत आम्हाला सन्मान नाही असे हुंदके कीर्तिकरांसारख्या पुढाऱ्याला फुटावेत हे आश्चर्य आहे. त्यावर मिंधे गटाच्या प्रवक्त्याचे काय म्हणणे आहे? भाजपासंदर्भात असे हुंदके फुटल्यावर कीर्तिकरांनी हिंदुत्वाशी प्रतारणा केली की तुमचे ज्येष्ठ पुढारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कच्छपी लागले? हे लोकांना कळले तर बरे होईल.
लवकरच २२ आमदार बाहेर पडणार अशीही माहिती
मिंधे गटातील २२ आमदार आणि नऊ खासदारांची भाजपाच्या सापत्न वागणुकीमुळे कोंडी होते आहे. ते सगळे मिंधे गटातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत अशीही माहिती समोर आली आहे. मोठ्या गमजा मारत भाजपाची हातमिळवणी केली होती. मात्र वर्षाच्या आतच त्यांचा बहुदा प्रेमभंग झाला आहे आणि घटस्फोटाच्या गोष्टी होऊ लागल्या आहेत. खोक्यांनी स्वाभिमान आणि सन्मान विकत घेता येत नाही हेच पुन्हा सिद्ध झाले आहे. मिंधे गट म्हणतोय आम्ही लोकसभेच्या २२ जागा लढवू. म्हणजे भाजपाकडे त्यांनी तेवढ्या जागा मागितल्या, मात्र भाजपा त्यांना पाच ते सहा जागांचीही भीक घालायला तयार नाही. मिंधे गटात १३ खासदार पळाले. त्यांना त्या जागी १३ जागा तरी मिळतील का? हाच प्रश्न आहे.
देवेंद्र फडणवीस हे मिंधे गटाच्या गाडीचे ड्रायव्हर बनलेले आहेत. याचा सरळ अर्था असा की, सरकारची सूत्रे भाजपाकडे आहेत. फडणवीसांच्या हातातील गाडीस ते कधीही अपघात घडवून मिंधे गटाची वाट लावतील हे सांगता येत नाही. मिंधे गटाला भाजपा खिजगणतीतही धरायला तयार नाही. प्रश्न येतो भाजपाकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीचा. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने भाजपाशी संबंध तोडले ते याच सापत्न वागणुकीच्या मुद्द्यावर. शिवसेना म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान व स्वाभिमानाशी तडजोड करुन संसार चालवणं असह्य झाल्यामुळेच शिवसेनेस दूर व्हावे लागले.
शिवसेनेचे जमेल तिथे खच्चीकरण करायचे, शिवसेनेच्या नेत्यांना अडचणीत आणण्यच्या कारवाया गुप्तपणे करायच्या. चेहरा एक तर मुखवटा वेगळाच. म्हणजे गाडी चालवायला ड्रायव्हिंग सीटवर बसायचे व अशा पद्धतीने अपघात घडवायचा की ड्रायव्हर सुरक्षित राहून इतरांना राजकीयदृष्ट्या हे राम म्हणायला लावायचे. गरज सरो आणि वैद्य मरो हे भाजपाचे काम. ज्याच्या खांद्यावर हात ठेवायचा आणि त्याचाच खेळ खल्लास करायचा हे त्यांचे धोरण. म्हणूनच शिवसेनेने भाजपापासून लांब जाणेच पसंत केले. श्रीमंतांची गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाची मीठ-भाकरी बरी हे धोरण अवलंबले. भाजपास विरोधकांचे सोडाच मित्र पक्षांचेही हित बघवत नाही. मिंधे गटाच्या चाळीस कोंबड्या व १३ तुर्रेबाज कोंबडे भाजपाच्या खुराड्यात बंदीवान आहेत. त्यांच्या मानेवर कधी सुरी फिरेल सांगता येत नाही. खुराड्यात आज दाणे घातले आहेत. आधी दाणा मग कापती माना! कीर्तिकर यांनी मान सांभाळावी. असं म्हणत सामनातून जोरदार टीका करण्यात आली आहे.