ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने फोन करून त्यांना ही धमकी दिली. याबाबत स्वत: नितीन देशमुख यांनी माध्यमांना माहिती दिली असून राणे कुटुंबाविरोधात बोलल्याने मला ही धमकी मिळाली, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा – अबकी बार किसान सरकार! शेतकरी आत्महत्यांवरून टीका करत केसीआर यांची महाराष्ट्राच्या भूमीत राजकीय एन्ट्री
नेमकं काय म्हणाले नितीन देशमुख?
आज सकाळी ११.३० ते दुपारी १२ च्या दरम्यान मला दोन वेगवेगळ्या नंबरवरून फोन आले. त्यांनी नारायण राणे आणि नितेश राणेंचं नाव घेऊ मला जीवे मारण्याची धमकी दिली. आम्ही अनेक लोकांना मारून समुद्रात फेकून दिले आहे. त्यांचा अद्यापही पत्ता लागला नाही. तुम्ही मुंबईत आल्यानंतर तुमचाही तसाच समाचार घेऊ, अशी धमकी त्यांनी दिली असल्याची प्रतिक्रिया नितीन देशमुख यांनी दिली.
पुढे बोलताना, मी मंगळवारी मुंबईला येत असून तुम्ही नारायण राणे, नितेश राणेंना घेऊन रात्री ८ ते १० दरम्यान नरीमन पॉईंटवर या असे आव्हान मी धमकी देणाऱ्याला दिले असल्याचेही त्यांनी सांगितलं. तसेच त्यासाठी ते उद्या मुंबईला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.